Advertisement

आता सरकारी रुग्णालयांत मिळणार मोफत 'IVF ट्रीटमेंट'

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, राज्याच्या प्रजननदरामध्ये घसरण झाली आहे.

आता सरकारी रुग्णालयांत मिळणार मोफत 'IVF ट्रीटमेंट'
SHARES

अपत्यप्राप्ती होण्यात अडचण येत असलेल्या जोडप्यांना ‘आयव्हीएफ’ या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ आता सरकारी रुग्णालयांमध्येही घेता येणार आहे. राज्यातील सार्वजनिक वैद्यकीय कॉलेज व रुग्णालयांमध्ये ही सुविधा लवकरच पूर्णपणे नि:शुल्क देण्यात येणार आहे.

राज्यातील सार्वजनिक, तसेच खासगी वैद्यकीय कॉलेजांमधील प्रजनन आरोग्याशी निगडित तक्रारींची दखल घेत आठ वैद्यकीय कॉलेजांमध्ये ‘आयव्हीएफ’ केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.

मुंबईतील जे.जे. रुग्णालयासह अंबाजोगाई, बारामती, यवतमाळ, कोल्हापूर, नांदेड तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय कॉलेजांचा यात समावेश आहे. यासाठी 64 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.

‘आयव्हीएफ’साठी येणारा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्यांना सार्वजनिक आरोग्ययंत्रणेमध्ये ही सुविधांची उपलब्धता झाली तर त्यांची पालकत्वाची इच्छा पूर्ण करता येईल, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने हा उपक्रम राबण्याचे ठरवले आहे.

सार्वजनिक वैद्यकीय कॉलेजांमध्ये सुरू होणाऱ्या केंद्रांमध्ये प्रगत वैद्यकीय उपकरणांसह अल्ट्रासोनोग्राफी, तसेच एंडोस्कोपी यंत्रसामग्रीही उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे गरजूंना इथे खासगी रुग्णालयांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण वैद्यकीयसेवेचा लाभ घेता येणार आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, राज्याच्या प्रजननदरामध्ये घसरण झाली आहे. हे प्रमाण शहरी व ग्रामीण भागामध्येही चिंताजनक आहे. अशा स्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे गरजूंना दिलासा मिळेल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला.



हेही वाचा

टाटा रुग्णालय आणखी 5 केंद्रांमध्ये उपचार सुविधा सुरू करणार

वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या शिकवणी शुल्कात वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा