सावधान...देशात वाढत चालला आहे कर्करोग !


SHARE

 अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं नुकतंच सोशल नेटवर्किंग साईटवरून तिला 'हाय ग्रेड कॅन्सर' झाला असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली.  त्यामुळं तिचे चाहते तसंच संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. काही महिन्यांपूर्वी अभिनेता इरफान खान याने त्याला न्यूरो एंडोक्राइन ट्युमर हा आजार झाला असल्याची माहिती ट्विट केली होती.  इरफान आणि सोनाली सध्या कर्करोगाच्या उपचारासाठी भारताबाहेर आहेत.

कर्करोगाबद्दल सामान्य माणसांमध्ये काही भ्रम आहेत. हे भ्रम दूर करून 'हाय ग्रेड कॅन्सर' म्हणजे काय हे एशियन कॅन्सर इन्स्टिट्युटचे कर्करोगतज्ञ पदमश्री डॉ. रमाकांत देशपांडे यांच्याकडून जाणून घेऊया.


हाय ग्रेड कॅन्सर म्हणजे काय ?

कर्करोगाच्या पेशी शरीरातील एखाद्या भागात जाऊन ज्या वेगाने वाढतात त्या वेगावरून कर्करोगाची ग्रेड ठरवली जाते. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात ११ लाखांपेक्षा जास्त लोकांना कर्करोगाची लागण आहे. बदलत चाललेल्या लाईफस्टाईलमुळे कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. महिलांसंबंधीत असलेल्या कर्करोगाचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्याची माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली. शरीरातील कोणत्याही अवयवाला झालेल्या कर्करोगाच्या तीव्रतेवरून आपण त्याचा ग्रेड ठरवू शकतो. अभिनेत्री सोनाली बेंद्रेला झालेला कर्करोग हा हाय ग्रेड आहे असं तिनं तिच्या पत्रात नमूद केलं आहे.

कर्करोगाची लक्षणं

डोकेदुखी
चक्कर येणं
दिसण्यास कमी येणं
एखादी जखम झाल्यास बरी न होणं
श्वास घेण्यास अडथळा
अस्वस्थता


मेटॅस्टॅटीक कॅन्सर म्हणजे काय ?

मेटॅस्टॅटीक कॅन्सर म्हणजे जर शरीरातील एखाद्या अवयवाला कर्करोग झाला असेल तर कर्करोगाच्या पेशी दुसऱ्या अवयवालादेखील इजा पोचवतात. त्यामुळे शरीरातील इतर अवयवांमध्ये कर्करोग झपाट्यानं पसरण्यास सुरुवात होते. सोनालीनं पत्रातून हा कर्करोग मेटॅस्टॅटीक असल्याचं सांगितलं अाहे. यावरून तिच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी झपाट्याने वाढत असल्याची आपण कल्पना करू शकतो.  परंतू तिला नेमका कशाचा कर्करोग झाला हे तिनं नमूद केलं नसल्याचं डॉ. देशपांडे यांनी म्हटलं.


का होतो कर्करोग ?

आपला असा समाज झाला आहे कि जो व्यक्ती जास्त सिगरेट पितो किंवा दारू पितो त्यालाच कर्करोग होतो. पण अशी धारणा चुकीची आहे. कर्करोग हा व्यसनानेच होतो असं नाही.  ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कर्करोगाचं प्रमाण जास्त आहे. वाढत चाललेलं व्यसन, ताण-तणाव, शहरीकरणामुळे वाढतं प्रदूषण आणि अनुवांशिकतेमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.

प्रायमरी व मेटॅस्टॅटीक कॅन्सरमधील फरक

कर्करोग हा चार स्टेजमध्ये मोजला जातो. प्रायमरी कॅन्सरमध्ये कर्करोगाची पहिली आणि दुसरी स्टेज असते.  तर मेटॅस्टॅटीक कॅन्सरमध्ये तिसरी व चौथी स्टेज असते. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये उपचारापासून वाचण्याची ९० टक्के शक्यता असते. तिसऱ्या स्टेजमध्ये ७० टक्के तर चौथ्या स्टेजमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी वाचण्याची शक्यता असते. प्रायमरी कॅन्सर उपचार करून समूळ नष्ट करू शकतो. मात्र, मेटॅस्टॅटीक कॅन्सरमध्ये उपचार करूनदेखील कॅन्सर परत उद्धभवण्याची शक्यता असते.  याचा अर्थ मेटॅस्टॅटीक कॅन्सरमधून रुग्ण पूर्णपणे बरा होईलच याची शाश्वती नसते.


प्रगतशील राष्ट्रांमध्ये वाढतोय कर्करोग

अमेरिका, कॅनडा यांसारख्या प्रगतशील राष्ट्रात बदलत चाललेल्या जीवनपद्धतीमुळे कर्करोगाचा धोकादेखील वाढत चालला आहे. भारतात १ लाख लोकांमध्ये १०० लोकांना कर्करोग असतो. येत्या १० वर्षात हा आकडा दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकतो. कर्करोगावर किमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि टार्गेट थेरपी म्हणजे औषधांच्या मदतीनं उपचार केला जातो.


महिलांमध्ये वाढतेय प्रमाण

भारतात महिलांच्या कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यामध्ये स्तन, गर्भाशय आणि अंडाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण अधिक आहे. पुढील दहा वर्षात याचं प्रमाण ६० टक्के वाढण्याची भीतीदेखील आहे. महिलांच्या कर्करोगांबद्दल योग्य त्या चाचण्या मॅमोग्राफी मशीनने केल्या जातात.


कर्करोगापासून स्वतःचा बचाव कसा करावा ?

नियमीत व्यायाम करणे
व्यसनापासून दूर राहणे
रस्त्यावरीन पदार्थ (खास करून चायनीज फूड) आणि प्रिझर्वव्हेटिव्ह पदार्थ टाळणे
प्रदूषणयुक्त वातावरणात जाणं टाळणे
भरपूर पाणी प्यावेहेही वाचा - 

ठाणे स्थानकावर पहिली पॅथाॅलॉजी लॅब, २४ तास कार्यरत

अंधेरी पूल दुर्घटना : मनोज मेहता यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
संबंधित विषय
ताज्या बातम्या