Advertisement

एसटी चालक, वाहक- लसीकरणापासून अद्याप वंचित

कोरोनाकाळात सुरुवातीपासूनच आघाडीवर राहून काम करणाऱ्या एसटी चालक, वाहकांच्या लसीकरणाबाबत राज्य सरकारकडून अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.

एसटी चालक, वाहक- लसीकरणापासून अद्याप वंचित
SHARES

कोरोनाकाळात सुरुवातीपासूनच आघाडीवर राहून काम करणाऱ्या एसटी चालक, वाहकांच्या लसीकरणाबाबत राज्य सरकारकडून अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासंदर्भात २ महिन्यांपासून राज्य सरकारकडे प्रस्ताव पडून आहे. आतापर्यंत राज्यात एसटीचे ४ हजार २८२ कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चालक, वाहकांची संख्या अधिक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागला व एसटीचीही सेवाही ठप्प झाली. परंतु, राज्यात अडकलेले परप्रांतिय मंजूर, कामगारांची वाहतूक करण्याची जबाबदारी रेल्वेबरोबरच एसटीनंही उचलली आणि लाखो श्रमिकांना घराकडे परतण्यास मदत केली. त्यानंतर राज्यांतर्गत गाव ते तालुका वाहतूक सेवा देताना सुरुवातीपासूनच महामंडळाचे चालक-वाहकांबरोबरच यांत्रिकी कर्मचारी, वाहतुक नियंत्रक, सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचारी, अधिकारी कार्यरत राहिले.

कोरोनाकाळापासून कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांचा कोरोनाविरोधी आघाडीवरील कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करुन त्यांचंही १६ जानेवारी २०२१ पासून होणाऱ्या लसीकरण मोहीमेत समावेश करण्याची मागणी एसटी महामंडळानं या आधी राज्य सरकारकडे केली होती. सध्या एसटीत ३४ हजार चालक आणि २९ हजार वाहक आहेत. 

यातील मुंबई महानगरात तर दररोज होणाऱ्या एसटी फेऱ्यांवर २ हजार चालक-वाहक, शिवाय मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सेवेसाठीही असलेल्या एसटी गाड्यांवरही चालक-वाहक, यांत्रिकी कर्मचारी आहेत. त्यामुळं ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या जास्त होती, अशा मुंबई महानगरातही चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडलं. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असूनही यांना लसीकरणात समावेश करण्यात मात्र सरकार टाळाटाळ करत आहे.

बाधितांची संख्या ४ हजारांपार

एसटी महामंडळाच्या राज्यातील ४ हजार २८२ कर्मचारी, अधिकाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे. यामध्ये १२७ कर्मचारी सध्या उपचार घेत असून ४ हजार ४६ कर्मचारी उपचार घेऊन परत कर्तव्यावर आले आहेत. १०९ कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. १ मार्चला ४६ कर्मचारी करोनाबाधित झाले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा