Advertisement

जे जे रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांचा संप सुरूच

डाॅक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जे जे, केईएमसह अन्य रूग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. पण प्रत्यक्ष वाॅर्डमध्ये सुरक्षा रक्षक नसतात.

जे जे रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांचा संप सुरूच
SHARES

शनिवारी सकाळी जे जे रूग्णालयाच्या सर्जरी वाॅर्डमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी दोन कनिष्ठ निवासी डाॅक्टरांना मारहाण केली. या मारहाणीनंतर जे जे रूग्णालयातील ४०० डाॅक्टर संपावर गेले असून दुसऱ्या दिवशी, रविवारीही संप सुरूच आहे. हा संप मागे घ्यावा यासाठी रविवारी जे जे रूग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, आरोग्यमंत्री  आणि मार्डच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. पण ही बैठक निष्फळ ठरली असून जोपर्यंत वाॅर्डमध्ये सुरक्षा पुरवण्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची माहिती मार्डचे जनरल सेक्रेटरी डाॅ. आकाश माने यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


वाॅर्डमध्येही सुरक्षा रक्षक हवा
डाॅक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जे जे, केईएमसह अन्य रूग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. पण प्रत्यक्ष वाॅर्डमध्ये सुरक्षा रक्षक नसतात. तर सुरक्षा रक्षक वाॅर्डमध्ये केवळ रात्रीच्या वेळेस एकदाच फेरी मारतात. त्यामुळे वाॅर्डमध्ये अजूनही रूग्णांच्या नातेवाईकांकडून डाॅक्टरांवर हल्ले होताना दिसत आहेत. शनिवारी सर्जरी विभागात सुरक्षा रक्षक नव्हते आणि याचाच फायदा घेत रूग्णांच्या नातेवाईकांनी दोन कनिष्ठ निवासी डाॅक्टरांना बेदम मारहाण केली आहे. यात एका निवासी डाॅक्टरचा हात फ्रॅक्चर झाला आहे. 


रुग्णसेवेवर परिणाम नाही


या मारहाणीनंतर सुरक्षेच्या कारणावरून तात्काळ ४०० निवासी डाॅक्टर संपावर गेले आहेत. संपाच्या काळात प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक रूग्णालयांची जबाबदारी सांभाळत असल्यानं रूग्णसेवेवर संपाचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. असं असलं तरी यापुढं मात्र संपाचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संप मिटवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्यासाठीच रविवारी बैठक बोलावण्यात आली होती. 


...तोवर संप मागे नाही


या बैठकीत मार्डनं प्रत्येक वाॅर्डमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी ठेवली. त्यानुसार प्रशासनानं सुरक्षा रक्षक पुरवू असं आश्वासन दिलं. पण तात्काळ वाॅर्डमध्ये सुरक्षा रक्षक पुरवणं शक्य होणार नाही. त्यासाठी काही वेळ लागेल असं प्रशासनानं स्पष्ट केलं. प्रशासनाच्या या आश्वासनानं मार्डचं समाधान झालं नाही. ८० ते ९० सुरक्षा रक्षकांची तात्काळ नियुक्ती करणं रूग्णालय प्रशासनाला आणि सरकारला कसं काय शक्य नाही असा सवाल करत मार्डनं संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं डाॅ. माने यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पुढं नेमकं काय होत? संप चिघळतो का? याकडेचं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा