Advertisement

आला पावसाळा, आपल्या त्वचेला सांभाळा!


आला पावसाळा, आपल्या त्वचेला सांभाळा!
SHARES

पावसाळ्याला सुरुवात झाली असून या दिवसांमध्ये विविध प्रकारचे त्वचाविकार डोकं वर काढतात. या त्वचाविकारांना दूर ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. पावसाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घेता येईल याकरिता 'द एस्थेटिक क्लिनिक्स'च्या सल्लागार डरमॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटो सर्जन डॉ रिंकी कपूर यांनी दिलेल्या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत.

त्वचा आणि केस कोरडे राखा – पावसाळ्याच्या दिवसात डोक्यावरील केस व त्वचा अत्यंत नाजूक बनते. भिजून आल्यावर आपली त्वचा आणि डोकं कोरडं न केल्यास बुरशीच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं. ज्यांना कोंडा होण्याची सवय आहे, अशा व्यक्तींना केसांमध्ये खाज सुटते, बारीक संसर्गजन्य पुरळ येते. त्यातून रक्त येते. केस प्रचंड प्रमाणात गळू लागतात. याकरिता केस/ डोकं सतत कोरडं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच, हवेतील आर्द्रतेमुळं आणि त्यामुळं येणाऱ्या सततच्या घामामुळं विषाणूंचा संसर्ग वाढतो. गुडघ्याच्या मागे, पायाच्या बोटांमध्ये याची वाढ सर्वांत जास्त प्रमाणात चिखल्या होतात. या त्वचाविकारात दोन बोटांच्या मध्ये खाज येते, त्वचा लाल होते, काही वेळा त्वचा फाटल्या सारखीसुद्धा होते.

चेहऱ्याची स्वच्छता राखा – फेसवॉशचा वापर करा कारण त्यानं तुमची त्वचा ताजीतवानी होते. हे घटक मळ काढून टाकतात आणि चेहऱ्यावरील छिद्रं मोकळी करतात. कोणत्याही साबणानं तुमचा चेहरा धुणं शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणं जास्त खसखसून चेहरा धुवू नका.

त्वचेला टोनिंगची गरज - टोनर उरलेली घाण आणि मेकअप काढून आपल्या चेह-यावरील छिद्र स्वच्छ करतं आणि त्वचा घट्ट करते. टी ट्री, लिंबाचा रस, गुलाबाचं पाणी, काकडीचं पाणी आणि कॅमोमाइल चहा यासारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश असलेल्या टोनरचा वापर करा. जे तुमच्या त्वचेवरील मुरुमांची समस्या कमी करते.

रोज मॉईश्चरायझरचा वापर करा - त्वचेला कोरडेपणापासून दूर ठेवण्यासाठी मॉईश्चरायझरचा वापर करा. आपली त्वचा तेलकट दिसणार नाही अशा मॉइश्चरायझरची निवड करा. काकडी, नारळाचं तेल इत्यादीसारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझरची निवड करा. प्रवासादरम्यानही या मॉईश्चरायझरचा वापर करा.

सनस्क्रीनचा वापर करा - सुर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी त्वचेला सुरकुत्या तसेच टॅन होण्यापासून रोखण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणं गरजेचं आहे. पावसाळ्यातही आपण घराबाहेर पडताना प्रत्येक वेळी सनस्क्रीनचा वापर करावा.

भरपूर पाणी प्या – पावसाळ्यात तहान लागत नाही म्हणून पाणी कमी पिऊ नका. शरीराला आणि त्वचेला पाण्याची आवश्यकता असते ती भरून काढा.

नो मेकअप लूकची निवड करा - पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात तुमची त्वचा अतीशय नाजूक आणि संवेदनशील होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात अती मेकअप करू नये. कमीतकमी मेकअप करा. त्वचेला मोकळा श्वास घेऊ द्या.

स्क्रबचा वापर करा - मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा फेस स्क्रबचा वापर करा. घरच्या घरी बेसन, ओट्स किंवा ब्राउन शुगर, कॉफी, ग्रीन टी, साखर, बेकिंग सोडा, पपई, दूध आणि मध यांच्यासह दही, कडुनिंबाचा वापर करुनही आपण स्क्रब तयार करू शकतो. गुलाबाच्या पाणी आणि मुलतानी मातीची पेस्ट बनवा आणि आठवड्यातून दोनदा आपल्या चेहऱ्यावर लावा. हे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. बेसन, दूध, हळद आणि थोडी कडुलिंबाची पेस्ट एकत्र करून ती चेहऱ्याला लावू शकता. मुरुमांपासून दूर होण्यासाठी याची नक्कीच मदत होईल.

अँटी-फंगल पावडरचा वापर करा - पावसाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. आपल्या त्वचेवर आणि आपल्या पायाच्या बोटांच्या दरम्यान आणि स्तनाच्या खाली एक चांगली अँटी-फंगल पावडरचा वापर करून तुम्ही बुरशीजन्य वाढ रोखू शकता.

अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर टाळा – त्वचेला कोरडेपणापासून रोखण्यासाठी अतिशय गरम पाण्याचा वापर न करता कोमट अथवा थंड पाण्यानं अंघोळ करणं योग्य राहील.

रात्रीच्या वेळी चेहरा स्वच्छ करून मगच झोपा – रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढायला विसरू नका. त्वचा स्वच्छ पाण्यानं धुवून मगच झोपा. यासाठी क्लिंजर्सचा वापर करा.

आर्टीफिशियल ज्वेलरीचा वापर टाळा – पावसाळ्यात आर्टीफिशियल ज्वेलरी वापर असाल तर तसं करू नका. कारण या दिवसांत धातुंवर पाण्याच्या ओलसरपणामुळं परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळं त्वेचला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं या दिवसात कृत्रिम दागिन्यांचा वापर करताना काळजी घ्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा