Advertisement

जागतिक थॅलेसेमिया दिन: आमच्यासाठी रक्तदान करा !

जनुकीय बिघाडामुळे होणाऱ्या थॅलेसेमिया या आजाराच्या रुग्णांना तर आठवड्यातून तीनवेळा रक्ताची गरज भासते. याच गरजेपायी ३३ वर्षांपासून रक्त चढवणाऱ्या अभिषेकने सर्वांनाच ८ मे म्हणजेच जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त ''आमच्यासाठी रक्तदान करा'', असं म्हणत रक्तदानाचं आवाहन केलं आहे.

जागतिक थॅलेसेमिया दिन: आमच्यासाठी रक्तदान करा !
SHARES

दरवर्षी ८ मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळला जातो. मुंबईत जवळपास २ हजारांपेक्षा जास्त थॅलेसेमिया रुग्ण आहेत, अशी माहिती थिंक फाऊंडेशनचे डॉ. विनय शेट्टी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. थॅलेसेमिया आजाराच्या रुग्णांना महिन्यातून ३ वेळा तरी त्यांच्या गरजेनुसार शरीरात रक्त चढवावं लागतं.

तब्बल ३३ वर्षांपासून थॅलेसेमिया या रक्ताच्या आजाराने त्रस्त असलेल्या साताऱ्याच्या अभिषेक कमानेने महाराष्ट्रासह मुंबईतील तरुणांना आमच्यासाठी रक्तदान करा, असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रासह अख्ख्या मुंबईत अनेकदा रक्ताचा तुटवडा जाणवतो. रक्त वेळेवर उपलब्ध झालं नाही म्हणून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील ओढावतो. त्यातच जनुकीय बिघाडामुळे होणाऱ्या थॅलेसेमिया या आजाराच्या रुग्णांना तर आठवड्यातून तीनवेळा रक्ताची गरज भासते. याच गरजेपायी ३३ वर्षांपासून रक्त चढवणाऱ्या अभिषेकने सर्वांनाच ८ मे म्हणजेच जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त ''आमच्यासाठी रक्तदान करा'', असं म्हणत रक्तदानाचं आवाहन केलं आहे.


कोण आहे अभिषेक?

अभिषेक कमाने १ वर्षांचा असल्यापासून थॅलेसेमियाने त्रस्त आहे. ३० वर्षे ठाण्यात राहिल्यानंतर वडिलांच्या निवृत्तीनंतर आता साताऱ्यात राहत आहे. त्यामुळे महिन्यातून ३ वेळा साताऱ्याहून सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात त्याला रक्त चढवण्यासाठी यावं लागतं.


मॅचिंग रक्तगट गरजेचा

अभिषेक लहानपणापासून अशक्त होता. सारखा आजारी पडायचा. अभिषेकला थॅलेसेमिया आहे, असं कळलं तेव्हा वडील स्वत: रक्तदान करून दुसऱ्यांचा जीव वाचवायचे आणि आपल्या मुलासाठी ए-निगेटिव्ह रक्ताची सोय करायचे. कारण, ए-निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह अशा रक्तगटाचे रक्तदाता आणि रक्त सहज उपलब्ध होत नाहीत. म्हणून अभिषेकनेही अशा रुग्णांसाठी रक्तदान करण्याची कळकळीची विनंती 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केली.



थॅलेसेमियासाठी सेंट जॉर्ज हेच एकमेव

सरकारी रुग्णालयांपैकी केवळ सेंट जॉर्ज या रुग्णालयातच 'थॅलेसेमिया डे केअर सेंटर' आहे. हे सेंटर ४० हून अधिक वर्षांपासून सुरू आहे. या रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत रक्त आणि औषधं दिली जातात. आतापर्यंत १०० थॅलेसेमिया रुग्णांची सेंट जॉर्ज रुग्णालयात नोंद आहे. तर, ५० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी अजून व्हायची आहे.


मुंबईत किती रुग्ण?

मुंबईत २ हजारांपेक्षा जास्त थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत. दिवसाला १० थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्त दिलं जातं. अशा वेळी रक्त उपलब्ध होणं अनेकदा कठीण होतं. पण, काही सामाजिक संस्था आणि एनजीओ, रक्तपेढ्यांमुळे रक्त पुरवलं जातं. त्यामुळे रक्तदानाची प्रक्रिया सतत राबवली जाते, असं सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.



काय आहे थॅलेसेमिया?

थॅलेसेमिया हा रक्ताचा आजार असून हा जनुकीय बिघाड झाल्याने होतो. शरीरातील हिमोग्लोबिन रक्त निर्माण होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. ज्यामुळे शरीरात रक्त तयार होऊ शकत नाही. अशा रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांच्या जागी केवळ २० दिवस पुरेल इतकीच असते. त्यामुळे रूग्णांना त्यांचं एच-बी म्हणजेच हिमोग्लोबिन तपासून गरजेनुसार रक्त चढवावं लागतं. एका थॅलेसेमिया रुग्णाला आठवड्यातून तीनदा रक्त चढवावं लागतं.


कसा होतो थॅलेसेमिया ?

अनेकदा नात्यातच लग्न केली जातात. अशा वेळी माता किंवा पिता या दोघांपैकी एकाच्या रक्तात जरी माइनर किंवा मेजर थॅलेसेमिया आढळला तर, तो पुढे बाळाला होतो. माइनर थॅलेसेमियात फक्त एक गुणसूत्र प्रभावित होतात. पण, मेजर थॅलेसेमियात दोन्ही गुणसूत्र निकामी होतात आणि त्या रुग्णाला जास्त रक्तपुरवठ्याची गरज भासते.


काय आहेत थॅलेसेमियाची लक्षणे ?

  • अशक्तपणा
  • थकवा
  • अस्थीविकृती
  • शरीर पिवळं पडणं
  • शारीरिक विकास धिम्या गतीने
  • हृदयाची समस्या



हेही वाचा-

'थॅलेसिमिया' एक गंभीर आजार

थॅलेसेमिया झाला म्हणून बापानं मुलीला टाकलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा