Advertisement

मुंबईत रविवारी दिवसभरात ९२१ रुग्ण

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असून, रविवारी नवीन ९२१ बाधितांची नोंद झाली.

मुंबईत रविवारी दिवसभरात ९२१ रुग्ण
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असून, रविवारी नवीन ९२१ बाधितांची नोंद झाली, तर ४ जणांच्या मृत्यू झाला. चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाणही (पॉझिटिव्हिटी रेट) वाढलं असून, हा दर ४ टक्क्यांवरून ६ टक्क्यांच्याही पुढे गेला आहे.

मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या १५ दिवसात तिपटीनं वाढ झाली आहे. १ फेब्रुवारीला ३२८ रुग्ण आढळले असताना त्यानंतर मात्र दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी तर ही रुग्णसंख्या हजाराच्या जवळ पोहोचली. रविवारी ९२१ नवीन रुग्ण आढळल्यामुळं एकूण बाधितांची संख्या ३,१९,१२८ झाली आहे. तर एका दिवसात ५४० रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ९९ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली असून सध्या ७२७६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णाची संख्या अधिक आहे. सुमारे ४५९२ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत तर सुमारे २०४३ रुग्णांना लक्षणे आहेत. तर २६५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळं मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. शनिवारी १६,१३५ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६ टक्क्याहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. तर ४३०० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ४ टक्के अहवाल बाधित आले आहेत. आतापर्यंत ३१लाख ३३ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

रविवारी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १ पुरुष व ३ महिला होत्या.  मृतांची एकूण संख्या ११,४४२ वर गेली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर आणखी वाढून ०.२० टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधीही ३४६ दिवसांपर्यंत खाली गेला आहे.

मुंबईत आता सर्वच भागात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुलुंड, वांद्रे, चेंबूर, वडाळा, सायन, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, ग्रँटरोड, भांडुप, देवनार या भागात रुग्णवाढ सर्वात अधिक आहे. महापालिकेनं रुग्णांच्या निकट संपर्कातील लोकांचा शोध घेण्याची कारवाई कठोर पावले उचलली असून, शनिवारी एका दिवसात रुग्णांच्या निकटचे ११,४४९ संपर्क शोधले आहेत.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा