Advertisement

भारत पेट्रोलियम कंपनीकडून मुंबईला मिळणार मोफत वैद्यकीय प्राणवायू


भारत पेट्रोलियम कंपनीकडून मुंबईला मिळणार मोफत वैद्यकीय प्राणवायू
SHARES

भारत पेट्रोलियम कंपनीकडून मुंबईला मोफत वैद्यकीय प्राणवायू मिळणार आहे. हा प्राणवायू मोठ्या सिलिंडरमध्ये भरण्यासाठी महापालिकेतर्फे माहुल इथं प्राणवायू पुनर्भरण प्रकल्प उभारला जात आहे. त्याकरिता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबई रिफायनरीने सुमारे ४ कोटी रुपयांची संयंत्रे महापालिकेला दिली आहेत. ही संयंत्रे व दीड किमीची वाहिनी कंपनीने पालिकेला सुपूर्द केली आहे.

माहुल इथं प्राणवायू पुनर्भरण प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. त्यावर सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी बीपीसीएलने संयंत्रे दिली आहेत. त्यासोबत बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पापासून महानगरपालिकेच्या जम्बो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्पापर्यंत सुमारे दीड किलोमीटर लांबीची प्राणवायू वाहिनीदेखील टाकली आहे.

येत्या दीड महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून सुरक्षाविषयक पूर्तता असल्याचे पेसो प्रमाणपत्र प्राप्त होताच सदर प्रकल्प कार्यरत होणार असल्याचे समजतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय प्राणवायूची गरज वाढली होती. त्याकरिता महापालिकेनं युद्धपातळीवर प्रयत्न करून अतिरिक्त साठा मिळावला होता. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून महापालिकेनं आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.

याअंतर्गतच बीपीसीएल कंपनी महापालिकेला प्रतिदिन सुमारे १० ते १५ मेट्रिक टन इतका वैद्यकीय प्राणवायू देणार आहे. हा प्राणवायू सिलिंडरमध्ये भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहुल येथे वैद्यकीय प्राणवायू जम्बो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (रिफिलिंग प्लाण्ट) उभारण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबई रिफायनरीने सुमारे ४ कोटी रुपयांची संयंत्रे महापालिकेला दिली आहेत. माहुल इथं बीपीसीएलच्या मुंबई रिफायनरीमध्ये गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात ही यंत्रणा महानगरपालिका प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली. या वेळी बीपीसीएल मुंबई रिफायनरीचे अधिकारी व महानगरपालिकेचे उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी विभाग) रमाकांत बिरादार, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त  विश्वास मोटे, यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा