Advertisement

न्युमोकोकल आजारापासून संरक्षण देणाऱ्या पीसीव्ही लसीकरणाला नवी मुंबईत सुरूवात

जन्मानंतर सहा आठवड्याच्या म्हणजेच दीड महिन्याच्या बालकास पीसीव्ही लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.

न्युमोकोकल आजारापासून संरक्षण देणाऱ्या पीसीव्ही लसीकरणाला नवी मुंबईत सुरूवात
SHARES

पाच वर्षाच्या आतील बालकांचे न्युमोकोकल आजारापासून संरक्षण करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला आहे. शासन आदेशानुसार मंगळवारपासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पीसीव्ही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय नेरुळ येथे शिवाजीनगर एमआयडीसी येथील अंश गजानन माडेकर हे 6 आठवड्याचे बाळ पीसीव्ही लसीचे पहिले लाभार्थी ठरले.

नवी मुंबई महापालिकेचा सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम नियमितपणे सुरु असून पालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे दरमहा एकूण 118 स्थायी लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहेत. याशिवाय 324 बाह्य संपर्क सत्रे आणि 28 मोबाईल सत्रे आयोजित करण्यात येतात. अशाप्रकारे दरमहा एकूण 470 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून  0 ते 6 वयोगट दरम्यान विविध आजारांपासून बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी 7 टप्प्यात 12 आजारांना प्रतिबंध करण्याकरिता सार्वत्रिक लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जातो. यामध्ये आता न्युमोकोकल कंज्युगेट व्हॅक्सीनचा (PCV) समावेश करण्यात आलेला आहे.

जन्मानंतर सहा आठवड्याच्या म्हणजेच दीड महिन्याच्या बालकास पीसीव्ही लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. 14 आठवडे म्हणजे साडेतीन महिन्याच्या बालकास दुसरा डोस तर नऊ महिन्याच्या बालकास बुस्टर डोस दिला जाणार आहे. नवी मुंबई महापालिकेस पीसीव्ही लसीचे 1500 डोस प्राप्त झाले असून ही पीसीव्ही लस विनामूल्य देण्यात येणार आहे.

पालिकेच्या रुग्णालयांप्रमाणेच अंगणवाडी, सोसायटी ऑफिसेस, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, दवाखाने, खाजगी रुग्णालये अशा विविध ठिकाणी बाह्य संपर्क सत्रे आयोजित कऱण्यात येत असून दगड खाणी, उड्डाणपुलाखालील वस्ती, स्टेशन लगतच्या वस्त्या, विटभट्ट्या, एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्टी भाग, बांधकाम साईट्स अशा ठिकाणी मोबाईल सत्रे आयोजित करण्यात येत असतात. एकही बालक विविध आजारांपासून संरक्षण करणाऱ्या सार्वत्रिक लसीकरणापासून वंचीत राहू नये असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश असून त्यानुसार आरोग्य विभागाने लसीकरणाचे नियोजन केलेले आहे.

पीसीव्ही लस देण्याबाबत नवी मुंबई महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी तसेच एएनएम यांचे रितसर प्रशिक्षण पूर्ण झाले असून आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनाही प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक (General Practitioner) यांचीही कार्यशाळा आयोजित करून त्यांना पीसीव्ही लसीकरणाबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

न्युमोकोकल आजाराचा धोका एक वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सर्वाधिक जाणवतो. तसेच 2 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपात आढळून येतो. या आजारामुळे लहान मुलांमध्ये होणारे धोके टाळण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात शासकीय आदेशानुसार न्युमोकोकल कन्ज्युगेट वॅक्सीनचा समावेश करण्यात आला असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 6 आठवडे पूर्ण झालेल्या बाळाच्या पालकांनी महानगरपालिकेच्या कोणत्याही रुग्णालय / नागरी आरोग्य केंदात विनामूल्य पीसीव्ही लसीचा डोस आपल्या बाळाला देऊन संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा