Advertisement

एका डॉक्टरवर हजार रुग्णांचा भार, सायन रुग्णालयात सोनोग्राफीला येणाऱ्या रुग्णांचे हाल

सायन रुग्णालयात सोनोग्राफी करणाऱ्या एका डाॅक्टरला महिन्याकाठी १ हजारहून अधिक रुग्णांना तपासावं लागत असून यामुळे रुग्णांसह डाॅक्टरच्या प्रकृतीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका डॉक्टरवर हजार रुग्णांचा भार, सायन रुग्णालयात सोनोग्राफीला येणाऱ्या रुग्णांचे हाल
SHARES

सायन रुग्णालयात सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत डाॅक्टरची संख्या मर्यादीत असल्याने या विभागावर सध्या प्रचंड ताण येत आहे. त्यातच महापालिका रुग्णालयातील प्रतिक्षा यादीवरील रुग्णही सोनोग्राफीसाठी सायन रुग्णालय गाठत असल्याने त्यांचाही अतिरिक्त भार सोनोग्राफी विभागावर पडत आहे. परिणामी एका डाॅक्टरला महिन्याकाठी १ हजारहून अधिक रुग्णांना तपासावं लागत असून यामुळे रुग्णांसह डाॅक्टरच्या प्रकृतीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


रुग्णांची प्रचंड संख्या

मुंबईसह खेड्यापाड्यातून महापालिकेच्या सायन रुग्णालयात दिवसाला हजारो रुग्ण वेगवेगळ्या उपचारांसाठी येतात. त्यातील बऱ्याच रुग्णांना अत्यंत तातडीने सोनोग्राफी करावी लागते. मात्र रुग्णांच्या प्रचंड संख्येच्या तुलनेत तज्ज्ञ डाॅक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांना वेळेत सोनोग्राफी करता येत नाही.


वास्तव काय?

असाच एक अनुभव बुधवारी दुपारी आला. सायन रुग्णालयात सकाळपासून सोनोग्राफीसाठी आलेला संजय नावाचा तरुण धावत धावत अधिष्ठाता यांच्या केबिनबाहेर आला आणि सोनोग्राफी विभागात मागील दीड तासांपासून डॉक्टरच नाही. त्यामुळे तिथे मोठी गर्दी झाली आहे, असं त्याने तिथं बसलेल्या रिसेप्शनीस्टला सांगितलं.

या माहितीच्या आधारे ‘मुंबई लाइव्ह’ने सोनोग्राफी विभागात चौकशी केल्यावर रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागा (ओपीडी)तील पहिल्या मजल्यावर मोठी गर्दी झाल्याचं समजलं. तेथील रुग्ण आणि नातेवाईकांशी बोलल्यावर ते दोन तासांहून अधिक वेळ रांगेत असल्याचं स्पष्ट झालं.'अशी' आहे रुग्णालयातील यंत्रणा

याविषयी, 'मुंबई लाइव्ह'ने सायन रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णालयातील नेमक्या स्थितीवर प्रकाश टाकला.

सायन रुग्णालयात दिवसाला जवळपास ३०० रुग्ण फक्त सोनोग्राफी करण्यासाठी येतात. त्यासाठी रुग्णालयात एकूण १२ मशीन्स आहेत. त्यापैकी ९ मशीन्स सोनोग्राफी विभागात आहेत. १ मशीन वरिष्ठ डॉक्टरांना देण्यात आली आहे आणि उर्वरीत मशीन्स इमर्जन्सीसाठी आहेत. या प्रत्येक मशीनवर प्रत्येकी एक वरिष्ठ डॉक्टर असतो आणि त्यांच्यासोबत रिपोर्ट लिहिण्यासाठी एक डॉक्टर असतो. यानुसार एकूण ९ डॉक्टर एका वेळच्या 'ओपीडी'साठी असतात. पण, रुग्णांची संख्या पाहता या डॉक्टर आणि मशीन्सची संख्या कमी ठरते.


इतर रुग्णालयाचाही भार

सायन रुग्णालयात दिवसाला फक्त एका विभागात जवळपास ३०० रुग्ण दाखल होतात. सोनोग्राफी किंवा ओपीडीची वेळ एकच असल्याने मोठी गर्दी होते. त्यामुळे आम्ही लवकरच रुग्णांसाठी 'टोकन सिस्टिम' सुरू करणार आहोत. शिवाय रुग्णालयात बरचसे अंतर्गत बदल होत असल्यानेही रुग्णांची अडचण होते. एकट्या सोनोग्राफी विभागातच नाही, तर उर्वरीत विभागातही रोज तेवढीच गर्दी असते. शिवाय आमच्याकडे पालिकेच्या इतर रुग्णालयांमधूनही रुग्ण येतात. आम्ही त्यांना उपचारासाठी नाही म्हणू शकत नाही, त्यामुळेही डॉक्टर आणि यंत्रणेवर अतिरिक्त भार येतो.

- डॉ. जयश्री मोंडकर, अधिष्ठाता, सायन रुग्णालय


योग्य उपचार देणं हे काम

आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य वेळी योग्य ट्रिटमेंट देणं हे आमचं काम आहे. पण, रुग्णांची संख्या एवढी असते की कधी कधी त्यांना सांभाळणं देखील कठीण होतं. सकाळी ८ ते ५ या ओपीडीच्या वेळेत ओपीडीच नाही तर क्रिटीकल, इमर्जन्सी, गर्भवती महिला असेही रुग्ण सोनोग्राफीसाठी येतात. मग, त्यांची प्राधान्यक्रमानुसार सोनोग्राफी केली जाते. त्यामुळे एका डॉक्टरला दररोज किमान ३० किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करावी लागते.

- डॉ. अनघा जोशी, प्रमुख आणि प्रोफेसर, रेडिओलॉजी डिपार्टमेंट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा