Advertisement

विशेष सप्ताहामुळे शिक्षकांना पुन्हा शाळाबाह्य काम

येत्या २९ ऑक्टोबरपासून नवा जनजागृती सप्ताह साजरा करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. या साप्ताहिक कार्यक्रमांत शाळा, कॉलेजांनाही सहभागी करून घेण्यात येणार असल्यानं शैक्षणिक संस्थांना पुन्हा शाळाबाह्य काम करावं लागणार आहे.

विशेष सप्ताहामुळे शिक्षकांना पुन्हा शाळाबाह्य काम
SHARES

वेगवेगळे दिन आणि सप्ताह आयोजित करण्याच्या नवीन प्रथा सुरू झाल्या आहेत. या प्रथेनुसार येत्या २९ ऑक्टोबरपासून नवा जनजागृती सप्ताह साजरा करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. या साप्ताहिक कार्यक्रमांत शाळा, कॉलेजांनाही सहभागी करून घेण्यात येणार असल्यानं शैक्षणिक संस्थांना पुन्हा शाळाबाह्य काम करावं लागणार आहे.


शाळा, कॉलेजांचाही सहभाग

२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था आणि स्वायत्त संस्थांतर्फे जनजागृती सप्ताह आयोजित केला जाणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन सप्ताहास सुरुवात होईल. यात यंदा शाळा, कॉलेजांनाही सहभागी करण्यात आलं असून, कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.


शिक्षक नाराज

सरकारद्वारे दरवर्षी प्रत्येक शैक्षणिक वर्षात विविध दिन आयोजित करण्यात येत असल्यानं शाळांवर आधीच भार आहे. यातच दर महिन्याला नवीन सप्ताहाचा समावेश होत आहे. या सप्ताहात शाळा, कॉलेजांत भ्रष्टाचाराच्या परिणामांची माहिती देण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा आयोजित करण्यास सांगितलं आहे. शाळांमध्ये नेमके कोणते कार्यक्रम झाले, याचा अहवालही सादर करावा लागणार आहे.

सध्या सहामाही परीक्षांची तयारी सुरू असतानाच, शिक्षकांना आणखी एक अशैक्षणिक काम करावं लागणार आहे. यासर्व प्रकाराविरोधात शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शाळाबाह्य कार्यात मुळात दक्षता नेमकी कुणाची आणि तिचे कार्यक्रम शाळा, कॉलेजात का? प्रशासकीय यंत्रणेशी संबंधित गोष्टी या त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याशिवाय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शाळाबाह्य गोष्टी रोखण्यासाठी सर्व विभागांची एकत्रित बैठक घेण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र अद्यप या बैठकीचं आयोजन करण्यात आलं नाही.
- प्रशांत रमेश रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा