कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत आतापर्यंत मुंबईत ७ लाख घरांमधील २४ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
एकूण ३५ लाख घरांपैकी १९.८३ टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मुंबईत ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत पालिकेच्या स्वयंसेवकांचे पथक प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहे. यामध्ये वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यासारख्या सहव्याधींची माहिती घेण्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे शरीराचे तापमान व ऑक्सिजन पातळीदेखील नोंदवून घेण्यात येत आहे.
कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोणकोणत्या उपाययोजना आपापल्या स्तरावर अमलात आणाव्यात, याचीही माहिती घरोघर जाऊन देण्यात येत आहे. तसेच ही माहिती सहजसोप्या भाषेत देणारे एक पत्रकदेखील प्रत्येक घरी देण्यात येत आहे.
मुंबईत एकूण ३५ लाखांहून अधिक घरे असून या सर्व व घरांचे आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे दोन वेळा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिकेने अनेक पथके तयार केली आहेत. प्रत्येक चमूत ३ स्वयंसेवक कार्यरत आहेत. प्रत्येक पथक दररोज साधारणपणे ५० कुटुंबीयांचे सर्वेक्षण करीत आहे.
महापालिकेच्या सर्व २४ विभागांपैकी ‘बी’ विभागाची म्हणजेच डोंगरी, मशिदबंदर येथील टक्के वारी सर्वाधिक म्हणजेच ३७.१२ टक्के इतकी आहे. त्या खालोखाल ‘एल’ विभागातील म्हणजेच कुर्ला येथील ३३.६९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर ‘सी’ विभागातील गिरगाव, मुंबादेवी येथील २८.६९ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.