Advertisement

रुग्णांच्या सुरक्षेसाठी सेव्हनहिलमध्ये आणखी १०० खाटा


रुग्णांच्या सुरक्षेसाठी सेव्हनहिलमध्ये आणखी १०० खाटा
SHARES

मागील अनेक दिवसांपासून मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळं महापालिकेनं कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेनं दिवसाला चाचण्यांची संख्या वाढवली आहे. अशातच आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याने सेव्हनहिल रुग्णालयामध्येही खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या असलेल्या २०० खाटांमध्ये अजून १०० खाटांची भर पडणार आहे. त्यातील २० खाटा बुधवारी वाढवण्यात आल्या, पुढील खाटा टप्प्याटप्याने वाढवण्यात येणार आहे.

कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्यास पूर्वतयारी असावी, या दृष्टीने जम्बो सेंटरमध्ये २५० आयसीयू खाटांची उपलब्धता असल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव येथील नेस्को केंद्रासह महालक्ष्मी येथील जम्बो केंद्रातही खाटांची संख्या टप्प्याटप्यानं वाढवण्यात येणार आहे. सध्या विविध केंद्रामध्ये खाटांची उपलब्ध क्षमता १७ हजार ४२६ इतकी आहे. त्यातील ११ हजार ५०६ खाटा रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या आहेत, तर पाच हजार ९२० खाटा उपलब्ध आहेत.

आयसीयू खाटांसाठी उपलब्धता ही १ हजार ७३२ असून त्यापैकी १४१ खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजनची उपलब्धता असलेल्या खाटांची क्षमता ही ८ हजार ८३७ असून, सध्या उपलब्धता ३ हजार ७८ खाटांची आहे. तर व्हेन्टिलेटर असलेल्या एक हजार १०२ खाटांपैकी केवळ ६७ खाटा रिकाम्या असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून आले आहे.

सेव्हनहिल रुग्णालयात ९ हजार ४४७ रुग्णांना उपचार देण्यात आले आहेत. कोरोनापश्चात व्याधी दिसत असलेल्या रुग्णांसाठी पोस्ट कोविड ओपीडीही सुरू करण्यात आली आहे. त्यात बुधवारी आणि शनिवारी १० ते १२ व्यक्ती उपचारासाठी येतात.

संबंधित विषय