Advertisement

'स्वमग्न' मुलांसाठी पालिकेच्या धारावीतील रुग्णालयात स्वतंत्र कक्ष


'स्वमग्न' मुलांसाठी पालिकेच्या धारावीतील रुग्णालयात स्वतंत्र कक्ष
SHARES

मुंबई - आत्मकेंद्री पद्धतीने स्वतःच्या जगात हरवून जाणा-या 'स्वमग्न' (Autism) मुलांवर प्रभावी उपचार करण्यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने आणि 'हाय -मिडिया' या कंपनीच्या सहकार्याने नुकताच एक विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे. धारावी परिसरातील 60 फूटी रस्त्यावर असणाऱ्या आणि 'छोटा सायन हॉस्पिटल' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नागरी आरोग्य केंद्राच्या पहिल्या मजल्यावर हा कक्ष सुरु करण्यात आला आहे. 'स्पीच थेरपी', 'ऑक्युपेशनल थेरपी' आणि 'रेमेडियल थेरपी' या तीन उपचार पद्धतींच्या माध्यमातून स्वमग्न मुलांवर इथे अल्पदरात उपचार करण्यात येत आहे.
भारतात सामान्यपणे दर हजार मुलांमागे 4 मुले स्वमग्न असल्याचे आढळून येते. एखादा मुलगा स्वमग्न असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार नियमित आणि सुयोग्य औषधोपचार करणे गरजेचे असते. हे औषधोपचार बालरोगचिकित्सा, मनोविकारचिकित्सा आणि ऑक्युपेशनल थेरपी यांच्या माध्यमातून संयुक्तपणे करणे आवश्यक असते. तसेच हे उपचार करताना त्या मुलांना अनुरुप असे वातावरण असल्यास उपचार अधिक प्रभावी ठरु शकतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने धारावी परिसरात स्वमग्न मुलांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु केला असल्याची माहिती बालरोग चिकित्साविभागातील प्राध्यापिका आणि न्युरो डेव्हलपमेंटल सेंटरच्या प्रमुख डॉ. मोना गजरे यांनी दिली आहे.
या कक्षामध्ये 2 ते 16 वर्षे या वयोगटातील स्वमग्न मुलांवरील उपचारांच्या अनुषंगाने विविध अत्याधुनिक सामुग्री आणि खेळणी आहेत. या कक्षात एका सत्राच्या उपचारासाठी रुपये 250 एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींच्या मुलांना आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे.
सध्या या केंद्रात 20 स्वमग्न मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. या केंद्रात उपचार करण्यासाठी स्वमग्न मुलांची नोंदणी करावयाची झाल्यास; त्यांना प्रथम महापालिकेच्या शीव परिसरातील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (OPD) नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 12 या कालावधीत करता येणार आहे. येथे प्राथमिक तपासणी झाल्यानंतरच संबंधित मुलांना धारावी परिसरातील 'छोटा सायन' रुग्णालयात आवश्यकतेनुसार संदर्भीत केले जाणार आहे, अशीही माहिती डॉ. मोना गजरे यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा