दरवर्षी 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सलाम फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ मुंबईच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनावर आधारीत एक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात तरुण मंडळींचं लक्ष वेधण्यासाठी तंबाखू विरोधी रांगोळी, टीव्ही शो, पोस्टर्स, पथनाट्य आणि सेल्फी अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.
आपण आजही अनेकदा रस्त्यात उभं राहून सिगरेट ओढताना, तंबाखू खाताना मुलं, मुली, माणसं पाहतो. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी भारतात सुमारे 10 लाख लोकांचा मृत्यू होतो. देशात प्रौढांमध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचं प्रमाण अधिक आहे. पण, आता अल्पवयीनही अशा पदार्थांचं सेवन करताना दिसतात. याच पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो. पण, व्यसनमुक्तीपासून देशाचा भावी आधारस्तंभ असलेली ही पिढी कोसो दूर आहे. तंबाखूजन्य पदार्थ बाजारात विकणे, त्याचं उत्पादन, साठवणूक आणि विक्री करण्यावर राज्य शासनाने अनेकदा बंदी घातली. पण, त्यातूनही फारसं निष्पन्न झालं नाही.
भारताला सध्या सर्वांत मोठा धोका म्हणजे तंबाखूसेवनाचा आहे. 13 ते 15 वर्ष वयोगटातील 14.66 टक्के लोक तंबाखूसेवन करतात. लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती असली, तरीही याविषयावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनची मुलं नेहमीच तंबाखू विरोधी प्रसारासाठी कार्य करत आहेत आणि आपण सगळ्यांनीच तंबाखूविरोधी भूमिका घेतली पाहिजे. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
त्शेरिंग भुतिया, सलाम बॉम्बे फाउंडेशन जनरल मॅनेजर (टोबॅको कंट्रोल)
तंबाखूच्या अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अॅन्टबीन, अॅपनाबेसीन अशी रसायने असतात. तर, भारतीय तंबाखूत मर्क्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम अशी विषारी रसायने असतात. त्याशिवाय तंबाखूच्या धुरात आणि डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया अशी रसायने असतात.
तंबाखूमुळे होणारे आजार
तोंडाचा कर्करोग
तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशयाचा कर्करोग
तंबाखूत असणाऱ्या निकोटीनमुळे मेंदूचे कार्य मंदावते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते.
शासन तंबाखूविरोधात अनेक कायदे करत आहे. पण, त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याने तंबाखू खाणाऱ्यांचं आणि तंबाखूमुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी 31 मे ला 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा करण्यात येतो आणि जगभरात या निमित्ताने या विषयावर मोर्चे, प्रदर्शनं आणि अन्य माहितीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी डब्ल्यूएचओनेही ‘टोबॅको- अ थ्रेट टू डेव्हलपमेट’ हा विषय निवडला.
तंबाखूत निकोटीन नावाचं रसायन असतं. जे तंबाखू खायची आपल्यात इच्छा जागृत करते. जवळजवळ दिवसाला 100 रुग्ण फक्त कर्करोगाचे येतात. त्यात फुफ्फुसांचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग असणारे रुग्ण असतात. 35 टक्के रुग्णांना फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग होतो जे तंबाखू खातात. तंबाखूसेवन, धूम्रपान, तंबाखूचं पान आदींच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात कर्करोग होतो. जर भारतातील लोकांनी खरंच तंबाखूजन्य पदार्थ सेवन करायचं सोडलं तर नक्कीच 35 टक्के लोकांना कर्करोगाचा आजार होणार नाही.
डॉ.एस.एच.अडवानी , ऑन्कोलॉजिस्ट
तंबाखूचं सेवन हे फक्त कर्करोगालाच आमंत्रण देत नाही तर, दुसरे आजारही तंबाखूमुळे होऊ शकतात. तंबाखूसेवनाच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती गरजेची आहे. एखाद्या व्यक्तीला तंबाखूचं व्यसन असेल तर त्या व्यक्तीला ते व्यसन सोडायला लावणंं फार कठीण असतं. त्यामुळे तंबाखू व्यसन मुक्ती केंद्रदेखील असतात. तसंच वेगवेगळे प्रकारचे शिबीर राबवायला पाहिजेत. त्यातून जनजागृती केली पाहिजे. या सर्व गोष्टी केल्या तरच 30 ते 40 टक्के तोंडाचा कर्करोग असणारे रुग्ण कमी होतील. फक्त तंबाखूच नाही तर गुटखासुद्धा अपायकारक असतो. त्यावरही योग्य तो प्रतिबंध घातला पाहिजे.
डॉ. ध्येैर्यशील सावंत, ऑन्कोलॉजिस्ट
महाराष्ट्रात तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना दिसून येते. 2012 -2013 मध्ये जिल्हास्तरीय सर्वेक्षणात राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखूसेवनाचे व्यसन आढळून आले आहे. दरवर्षी जगात तब्बल 60 लाख नागरिकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. 2030 पर्यंत हा मृत्यूचा आकडा 80 लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोठ-मोठ्या शहरातील तरुणांमध्ये फॅशन म्हणून तसेच आधुनिक जीवनशैलीमध्ये कामाच्या ताण-तणावामुळे धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मनावर ताबा ठेवून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे, हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.