Advertisement

आजोबांनी गिळला दात, आॅपरेशनने वाचला जीव

हिरडीला बसवलेला कृत्रिम दात कधीही निघून तो अन्ननलिकेत अडकू शकतो. असाच प्रकार ६५ वर्षांच्या अब्दुल गणी अहमद खान यांच्यासोबत झाला.

आजोबांनी गिळला दात, आॅपरेशनने वाचला जीव
SHARES

तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या कुणीही कृत्रिम दात लावले असतील, तर वेळीच सावध व्हा. कारण हिरडीला बसवलेला कृत्रिम दात कधीही निघून तो अन्ननलिकेत अडकू शकतो. असाच प्रकार ६५ वर्षांच्या अब्दुल गणी अहमद खान यांच्यासोबत झाला. सुर्दैवाने खान यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची व कठीण एसोफॅगोटमी शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचवण्यात चेंबूरमधील झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील डाॅक्टरांना यश आलं.


कसा गिळला दात?

मुंबईत राहणारे ६५ वर्षांचे अब्दुल गणी यांनी पडलेल्या दाताच्या जागी एक कृत्रिम दात लावला होता. रोज रात्री हा दात काढून ते सकाळी पुन्हा लावत. एक दिवस नास्ता करत असताना हा दात त्यांनी नकळत गिळला. हा दात थेट त्यांच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला. त्यामुळे छाती आणि पोटाच्या वरील भागात असह्य वेदना होत असल्याची तक्रार घेऊन खान झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात आले.


श्वास घेणंही कठीण

खान यांच्या एक्स-रे काढण्यात आला, पण दात प्लास्टिकचा असल्याने तो एक्स-रेमध्ये दिसत नव्हता. त्यानंतर छाती आणि पोटाचा सीटी स्कॅन करून दात नेमका कुठे आहे ते शोधण्यात आलं. ६ सेंटीमीटरच्या या दाताने अन्ननलिका व्यापून टाकल्याने खान यांना श्वास घेणंही कठीण जात होतं.


'असा' काढला दात

“एण्डोस्कोपीच्या माध्यमातून दात काढण्यासाठी तीन वेळा प्रयत्न करण्यात आले. पण त्यात यश आलं नाही. दात अडकून ४८ तास होऊन गेले होते. तसंच रुग्णाची अवस्था बघता अधिक धोका पत्करणं शक्य नव्हतं. दातामुळे अन्ननलिकेला छिद्र पडलं असतं किंवा संसर्ग झाला असता, तर ते त्यांच्यासाठी जीवघेणं ठरू शकलं असतं. कारण दाताचं आकारमान अन्ननलिकेच्या तिप्पट होतं.

कवळीला घोड्याच्या खुरासारखा बाक असल्याने अन्ननलिकेच्या पुढील भिंतीला ती अडकली होती. त्यामुळे अन्ननलिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास अन्ननलिका उचलली जात होती आणि दात आणखी पुढे जात होता. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने अन्ननलिका कापून पुन्हा जोडावी लागली,'' असं झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक व गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट डॉ. रॉय पाटणकर म्हणाले.


रुग्णाची परिस्थिती खूप गुंतागुंतीची होती. कारण, त्यांचं वय जास्त होतं. रुग्णाला धूम्रपानाची सवय असल्याने भूल देणंही कठीण होतं. अन्ननलिका कापण्यात मोठा धोका असतो. ती आतल्या आत गळू शकते. मात्र, झेन हॉस्पिटलमधील तज्ज्ञांच्या पथकाने त्यांची अन्ननलिका कापून ती पुन्हा यशस्वीपणे जोडली.
- डॉ. तन्वीर मजीद, थोरिअॅक आँकोसर्जन, झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल


रुग्णाची प्रकृती उत्तम

शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी रुग्णाला नाकाद्वारे पोटापर्यंत घातलेल्या नलिकेद्वारे द्रव आहार देण्यात आला. शस्त्रक्रियेची जखम पूर्ण बरी झाल्यावर रुग्णाला तोंडावाटे अन्न घेण्याची परवानगी देण्यात आली. आता रुग्णाची प्रकृती उत्तम असून ते तोंडावाटेच अन्न घेत आहेत. एण्डोस्कोपीमध्ये अन्ननलिकेची जखम जवळपास बरी झाल्याचे दिसत आहे, असंही डाॅ. पाटणकर यांनी सांगितलं.



हेही वाचा-

झोपेतून उठवलं म्हणून डॉक्टरने रुग्णाचं डोकं फोडलं!

जागतिक स्किझोफ्रेनिया दिन - स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय?


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा