विकास आराखड्याच्या कार्यशाळेला 58 नगरसेवक गैरहजर!

  BMC
  विकास आराखड्याच्या कार्यशाळेला 58 नगरसेवक गैरहजर!
  मुंबई  -  

  मुंबईच्या 2014-34 विकास आराखड्याबाबत लोकांच्या हरकती आणि सूचना जाणून घेऊन नियोजन समितीने अंतिम प्रारूप विकास आराखडा बनवला आहे. या विकास आराखड्याची माहिती नगरसेवकांना करून देण्यासाठी भरवण्यात आलेल्या कार्यशाळेला मोजून 169 नगरसेवकांनीच हजेरी लावली होती. विकास आराखडा हा पुढील 20 वर्षांसाठी असल्यामुळे नगरसेवक मात्र, आपल्या विभागातील विकास आराखड्याची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.

  मुंबईच्या 2014-34 प्रारूप विकास आराखड्याबाबत लोकांच्या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने स्थायी समिती तीन आणि राज्य सरकारचे तीन अशी सहा सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल महापौरांना सादर केल्यानंतर मागील महापालिका सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या आराखड्याच्या अहवालावर महापालिका सभागृहात चर्चा करण्यापूर्वी एका कार्यशाळेचे आयोजन करून नगरसेवकांना याची माहिती दिली जावी,अशी मागणी झाली होती. त्यानुसार गुरुवारी 13 एप्रिल रोजी सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत आयोजित केलेल्या कार्यशाळेला केवळ 169 नगरसेवकांनीच हजेरी लावली होती. यामध्ये भाजपासह मनसे आणि सपाचे बहुतांशी नगरसेवक उपस्थित नव्हते. शिवसेना आणि काँग्रेसचे सर्वच नगरसेवक उपस्थित होते.

  महापालिका सभागृहामध्ये 227 नगरसेवकांपैकी 155 नगरसेवक हे नवीन नगरसेवक आहेत. परंतु या नवीन नगरसेवकांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरवली. त्यामुळे विकास आराखड्यात आपल्या विभागातील कोणती नवीन आरक्षणे टाकण्यात आली आहे, तसेच कुठली आरक्षणे काढून टाकण्यात आली आहे, याची माहिती जाणून घेण्याकरता ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणारे आहे. परंतु नवीन नगरसेवकच विकास आराखड्याबाबत गंभीर नसल्यामुळे सभागृहात काय भूमिका मांडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महापालिका सभागृहात लवकरच विकास आराखड्यावर चर्चा केली जाणार असून, यामध्ये नगरसेवकांनी केलेल्या सूचनांप्रमाणे आराखड्यात बदल केला जाणार असल्याचे विकास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.