Advertisement

सीरम लसीचा साठा वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना, महाराष्ट्राला मिळाले ९ लाख ६३ हजार कोरोना डोसेस

एअर इंडिया आणि स्पाइसजेट या विमानांच्या मदतीनं सिरम कंपनीनं १२ जानेवारीला पुण्याहून लसीचा साठा रवाना केला.

सीरम लसीचा साठा वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना, महाराष्ट्राला मिळाले ९ लाख ६३ हजार कोरोना डोसेस
(Twitter)
SHARES

राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. याअंतर्गत एअर इंडिया आणि स्पाइसजेट या विमानांच्या मदतीनं सिरम कंपनीनं १२ जानेवारीला पुण्याहून लसीचा साठा रवाना केला. 

यात राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. एसआयआयकडून पाठवलेल्या सर्व कोविड लस बॉक्सवर 'सर्वजण रोगमुक्त होऊ शकतात,' असं लिहलेलं होतं.

वृत्तानुसार, स्पाइसजेट विमानानं सकाळी आठ वाजता पुणे विमानतळावरून दिल्ली आणि चेन्नई इथं उड्डाण केलं. सकाळी ९.३० वाजता एअर इंडियानं अहमदाबादसाठी ७०० किलो वजनाचं सामान घेऊन उड्डान केलं.

ट्विटरवर स्पाइसजेटनं जाहीर केलं की, एअरलाइन्सनं COVID 19 ची लस वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला याचा अभिमान आहे. ही ऐतिहासिक लसीकरण मोहीम वेळेवर सुरू होण्यासाठी कर्मचारी वचनबद्ध आहेत.

दिवसभरात विमान कंपन्या गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद, भुवनेश्वर, बेंगलुरू, पटना आणि विजयवाडा या शहरांमध्ये ५६.६ लाख डोस पोहचवले आहेत. महाराष्ट्राला सीरम इन्स्टिट्यूट (एसआयआय) कडून कोविशील्डच्या लसीचे ९.६३ लाख डोस आणि कोव्हॅक्सिनच्या २० हजार डोसचे वाटप करण्यात आले आहे.

केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या १२०० व्हॅक्सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा आणि महापालिकांना करण्यात आला आहे. वरील वॉक इन कुलर, वॉक इन फिजर हे कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर, पुणे, नाशिक या विभागीयस्तरावर स्थापित करण्यात आले आहेत.

राज्यात आतापर्यंत कोवीन पोर्टलवर ७ लाख ८४ हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. राज्यात ३ हजार १३५ शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर " कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट (NEGVAC) " स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

लसीकरणासाठी प्राधान्य क्रमाने गट ठरवण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय आणि खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य आणि केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, म्युनिसिपल वर्कर्स इ.चा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे.

कोवीन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. सद्यस्थितीत लस टोचण्यासाठी १७ हजार ७४९ व्हॅक्सीनेटर्सची नोंदणी झाली आहे. ७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.



हेही वाचा

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ५३ रुग्ण

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेडून मार्गदर्शक सूचना जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा