
हा कनेक्टर निर्माणाधीन स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू अर्थात वर्सोवा-वांद्रे सी लिंकला जोडला जाणार आहे. त्यामुळे सी लिंकवरून वांद्रे पश्चिम, पाली हिल, वांद्रे फोर्ट आणि ताज लँड्स एंडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्ग मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDCकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सी लिंक प्रकल्पाचा भाग म्हणून उभारण्यात येणाऱ्या या कनेक्टरसाठी 1,722.40 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सुमारे 1,183.79 कोटींचा सिव्हिल कन्स्ट्रक्शन खर्च असून, इतर संबंधित खर्च आणि GSTचाही समावेश आहे.
सध्या सी लिंक टोल प्लाझापासून पाली हिलपर्यंतचा सुमारे 2.6 किलोमीटरचा मार्ग अरुंद असून बहुतांश ठिकाणी 1+1 लेनची व्यवस्था आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या काळात हा छोटासा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल 20 ते 30 मिनिटे लागू शकतात.
नव्या कनेक्टरमध्ये चार लेन, रॅम्प आणि लूप्सचा समावेश असेल. एकूण 3.55 किलोमीटरच्या या मार्गामुळे रस्त्याची क्षमता वाढणार असून, सी लिंकवरून वांद्रे पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः पाली हिल आणि वांद्रे फोर्ट–ताज लँड्स एंड परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
या कनेक्टरची मागणी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी केली होती. त्यानंतर MSRDCने 19 ऑगस्ट 2024 रोजी अतिरिक्त कनेक्टरसाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला.
अखेर 28 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्रकल्पाला औपचारिक मंजुरी मिळाली असून, MSRDCला सी लिंकच्या वांद्रे फोर्ट टोकाला हा अतिरिक्त कनेक्टर उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
म्हणजेच, वर्सोवा-वांद्रे सी लिंकनंतर आता वांद्रे पश्चिमेकडील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा मार्ग तयार होणार आहे.
हेही वाचा
