Advertisement

बीडीडीतील सर्वेक्षण अखेर ठप्प


बीडीडीतील सर्वेक्षण अखेर ठप्प
SHARES

बीडीडी पुनर्विकास योजनेअंतर्गत नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडीतील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठीचे सर्वेक्षण म्हाडा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बुधवार, 17 मे पासून सुरू करण्यात आले. पण रहिवाशांनी या सर्वेक्षणाला जोरदार विरोध करत सर्वेक्षण हाणून पाडले. असे असताना म्हाडा आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशी, गुरुवारी सर्वेक्षण करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्ष गुरुवारी काही अधिकारी-कर्मचारी सर्वेक्षणासाठी बीडीडीत आलेच नाहीत. त्यामुळे बीडीडीतील बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम एका दिवसात ठप्प झाले आहे.

बुधवारी सर्वेक्षणाला सुरुवात केली असता नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या दोन्ही ठिकाणच्या रहिवाशांनी आधी करार मग पुनर्विकास अशी हाक देत सर्वेक्षणाला जोरदार विरोध केला. अधिकारी-कर्मचाऱ्यांना इमारतीत शिरूही दिले नाही. त्यामुळे काही वेळात सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तेथून पळ काढावा लागला होता. मात्र गुरुवारी पुन्हा सर्वेक्षण होईल, असे वाटत असताना गुरुवारीही सर्वेक्षण सुरू झाले नसून अधिकारीही फिरकले नसल्याची माहिती अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी दिली आहे. नायगाव येथील रहिवाशी कृष्णकांत नलगे यांनीही गुरुवारी सर्वेक्षण बंद असल्याचे सांगतानाच अर्जामध्ये आणि सादर करावयाच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्याने सर्वेक्षण बंद केल्याचे स्पष्ट केले आहे. या त्रुटी दूर करत सर्वेक्षण सुरू करावे अशी रहिवाशांची मागणी असल्याचे सांगतानाच नलगे यांनी मात्र रहिवाशांचा सर्वेक्षणाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वरळीतील आमदार सुनील शिंदे यांनीही सर्वेक्षणामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने या त्रुटी दूर करण्यासाठी लवकरच म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

सर्वेक्षणाला रहिवाशांचा कुठलाही विरोध नसून केवळ या त्रुटीमुळे सर्वेक्षण तात्पुरते बंद करावयास सांगितल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण म्हाडाच्या एका अधिकाऱ्याला याविषयी विचारले असता हे सर्वेक्षण उपजिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे, त्यामुळे याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे म्हणत या अधिकाऱ्याने सरळ हात वर केले. आता सर्वेक्षणच ठप्प झाल्याने पुढे काय होते, हा विरोध असाच सुरू राहिला तर, त्याचा प्रकल्पावर परिणाम होईल का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असून हे प्रश्न म्हाडाला शक्य तितक्या लवकर सोडवावे लागतील अशीही चर्चा आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा