Advertisement

गैरसोईंच्या गर्तेत मोनो रेल्वे!


गैरसोईंच्या गर्तेत मोनो रेल्वे!
SHARES

लोकल, बेस्ट बस, टॅक्सी-रिक्षा आणि मेट्रो नंतर मोनो रेल्वेही प्रवाशांच्या दैनंदिन दिनक्रमाचा घटक बनत चालली आहे. मात्र, प्रवासी संख्या जास्त असली तरी प्रवाशांना मोनो रेल्वेसाठी स्थानकात तब्बल २० ते २५ मिनिट उभं राहावं लागतं. याचं कारण म्हणजे 'दोन गाड्यांमधील २० मिनिटांचे अंतर आणि स्थानकांवर नसलेली आसन व्यवस्था'. मोनोचा प्रवास गारेगार असला तरी स्थानकांवर आसन व्यवस्था नसल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळं प्रवासी बसण्यासाठी स्थानकातील पायऱ्यांचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणं मोनोच्या स्थानकांमध्ये शौचालयाची सुविधा फक्त कर्मचाऱ्यांसाठी असल्यानं प्रवाशांची मोठी गैर सोय होतं आहे.

मोनो रेल्वेच्या चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यानंतर रविवार ३ मार्चपासून मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्पाचं अनावरण करण्यात आलं होतं. या टप्प्यात जीटीबी नगर, अॅण्टॉप हिल, वडाळा ब्रिज, आचार्य अत्रे नगर, दादर पूर्व, आंबेकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परळ आणि संत गाडगे महाराज चौक ही स्थानकं आहेत. सुरुवातीपासूनच या मार्गावर प्रवासी संख्या जास्त आहे. परंतु, सुविधांमध्ये कमतरता असल्यानं प्रवाशी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत. मोनोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून मोनोच्या स्थानकांवर बाक असावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत. मात्र, अद्याप आसन व्यवस्था नसल्यानं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. 

मोनोच्या ताफ्यात एकूण १० मोनो असून, त्यापैकी ५ नादुरुस्त आहेत. मात्र सद्यस्थितीत या मार्गावर ४ मोनो धावत आहेत. मोनोची संख्या कमी असल्याने फेऱ्याही कमी आहेत. एक मोनो स्थानकातून निघाल्यानंतर दुसऱ्या मोनोसाठी किमान २० ते २५ मिनिटांची प्रतीक्षा करावी लागते. एवढा वेळ प्रवाशांना स्थानकात ताटकळत थांबावं लागतं. त्यात आसन व्यवस्था नसल्यानं खास करून ज्येष्ठ नागरिक तसंच महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. त्यामुळं प्रवासी प्रवासी लवकरात ही सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी करत आहेत. 

दरम्यान, प्रवाशांच्या या मागणीबाबत मोनो रेलच्या अधिकाऱ्यांशी बातचित केली असता, त्यांनी 'मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील स्थानकात आसन व्यवस्था केल्याची माहिती दिली. त्याशिवाय, मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांवरही आसन व्यवस्था करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं'. मात्र, ही सुविधा नेमकी प्रवाशांना कधी मिळणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झाला. त्यावेळी मोनो रेल्वेही देशातील पहिला 'मोनो रेल' असल्यानं प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, कालांतरानं या मार्गावरील प्रवासी संख्येत घट झाली आणि मोनो रेल प्रकल्प तोट्यात गेला. 

मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर प्रवाशांची जास्त वर्दळ नसते. त्यामुळं येथील स्थानकांवरील आसनव्यवस्थेचा प्रवाशांना फारसा फायदा होत नाही. मात्र, त्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त आहे. परंतु, इथं आसनव्यवस्था नाही. त्यामुळं प्रवासी पर्यायी व्यवस्था म्हणून स्थानकातील पायऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र सध्या पावसाळा सुरू असल्यानं या पायऱ्या चढ-उतार केल्यानं ओल्या होतात. यामुळं प्रवाशांची मोठी गैर सोय होत आहे. त्यातच दोन गाड्यांमधील अंतर २० मिनिटं असल्यानं प्रवाशांच्या त्रासात भर पडत आहे. त्यात आणखी भर म्हणजे मुसळधार पावसामुळं तांत्रिक बिघाड होऊन फेऱ्या रद्द केल्या जातात. त्यामुळं निश्चित वेळेपेक्षा जास्तवेळ प्रवाशांना स्थानकात थांबून राहावं लागतं. 

मोनो रेल्वेच्या प्रवासासाठी प्रवाशांना काढलेलं तिकीट एण्ट्री गेटवर स्कॅन करणं बंधनकारक असतं. तिकीट स्कॅन केल्यानंतरच प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जातो. मात्र, एखाद्या ठिकाणी महत्वाच्या कामासाठी निश्चित वेळेत पोहोचायचं असेल आणि नेमकी त्यांच वेळेस मोनो रेल्वेही उशिरानं येणार असल्यामुळं प्रवासी रिक्षा-टॅक्सीचा पर्याय निवडतात. परंतु, स्थानकात प्रवेश केल्यानंतर बाहेर येण्यासाठी प्रवाशांना एक्झिट गेटवरील मशीनमध्ये तिकीट टाकणं बंधनकारक असतं. त्यामुळं प्रवाशांनी खरेदी केलेल्या तिकीटाचे पैसे वाया जातात.

शौचालय फक्त कर्मचाऱ्यांसाठी

कोणत्याही ठिकाणी प्रवाशांसाठी महत्वाची सुविधा म्हणजे 'शौचालय'. शौचालय नसल्यास प्रवाशांची मोठी गैर सोय होते. मात्र, मोनो रेल्वेच्या स्थानकांतील शौचालयाची सुविधा ही फक्त कर्मचाऱ्यांसाठीच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याच उदाहरण म्हणजे 'एका प्रवाशानं दादर पुर्व स्थानकात एका कर्मचाऱ्याला शौचालय कुठं आहे, असं विचारलं असता, त्या कर्मचाऱ्यानं त्याला हे 'शौचालय फक्त कर्मचाऱ्यांसाठी आहे, तुम्हाला वापर करायचा असेल तर स्टेशन मास्टरांची परवानगी घ्या', असं सांगितलं. 

मोनोच्या दादर पूर्व स्थानकात फक्त  एकचं शौचालय आहे. त्यामुळं महत्वाच्या क्षणी प्रवाशांची मोठी गैर सोय होत आहे. चेंबुर ते वडाळा डेपो आणि वडाळा डेपो ते सातरस्ता या मोनो रेल्वेच्या २ टप्प्यांमुळं प्रवाशांना प्रवास सुखकर झाला आहे. प्रवासी चेंबुरहून लोअर परळ आणि सातरस्ता इथं येण्यासाठी लोकल आणि इतर सार्वजनिक वाहनांऐवजी मोनोचा प्रवास पसंत करतात. मात्र, प्रवाशांच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या सुविधाच उपलब्ध नसल्यानं प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.

एकीकडं एमएमआरडीए प्रवाशांची संख्या वाढावी आणि त्यांना चांगली सुविधा मिळावी यासाठी सतत प्रयत्न करत आहे. त्यानुसार प्रवासी संख्याही वाढते. परंतु, प्रवासी संख्या वाढत असली, तरी मोनो रेल्वे प्रवाशांना सुविधा पुरविण्यात कमी पडत असल्याचं चित्र स्पष्ट होतं आहे.

मोनोच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास मंडळातर्फे (एमएमआरडीए) अनेक प्रयत्न केले जात आहे. प्रवाशांना योग्य सुविधा मिळावी तसंच मोनोच्या फेऱ्यांमध्ये वाढ व्हावी, यासाठी एमएमआरडीएनं आणखी १० मोनो विकत घेण्यचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, तांत्रिक बिघाडांच्या समस्यांवरही विशेष लक्ष दिलं जात आहे. त्याचप्रमाणं, मोनोच्या सुरक्षेवरही लक्ष केंद्रित केलं आहे. प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास यामधून प्रवाशांची सुरक्षित बाहेर कढण्यासाठी १० बूम लिफ्ट्स ट्रक खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एमएमआरडीएनं सिंगापूरमधील एका कंपनीची निवड केली आहे.

मुंबईतील सुरु झालेल्या मोनो रेल्वेमुळं प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी मिळाली. परंतु, प्रवाशांच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या सुविधांची कमतरता असल्यानं प्रवाशांचा त्रासात भर पडतं आहे. त्यामुळं एमएमआरडीए या सुविधा प्रवाशांसाठी कधी उपलब्ध करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.   




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा