Advertisement

म्हाडाची ‘दुकानदारी’


म्हाडाची ‘दुकानदारी’
SHARES

मुंबई - म्हाडाच्या घरांच्या सोडतीची अनेकजण वाटत पाहत असतील. पण म्हाडाकडे अद्याप सोडतीसाठी घरे नसल्याने मे 2017 ची सोडत तळ्यातमळ्यात आहे. असे असले तरी मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर आहे आणि ती म्हणजे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच अंदाजे 200 दुकानांसाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी ‘मुंबई लाईव्ह’ला दिली आहे. गोरेगाव, सायन, बोरिवली, प्रतिक्षानगर, घाटकोपर, मालवणी, मानखुर्द आणि अन्य ठिकाणाच्या दुकानांचा यात समावेश असणार आहे.

परवडणाऱ्या घरांबरोबरच आता परवडणाऱ्या किंमतीत मुंबईत दुकान घेण्याची संधी सर्वसामान्यांना तब्बल सात वर्षांनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. म्हाडाच्या गृहप्रकल्पात रहिवाशांच्या सोयीसाठी काही दुकानेही बांधली जातात. या दुकानांची विक्री निविदा पद्धतीने केली जाते. त्यानुसार दुकानांसाठीही इच्छुकांना अर्ज करावा लागतो. या अर्जानुसार म्हाडानं ठरवलेल्या दुकानांच्या किमतीपेक्षा जो अर्जदार सर्वाधिक बोली लावतो त्याला ते दुकान लागते. असे असले तरी म्हाडाच्या दुकानांच्या किंमती या बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी असल्याने दुकानांच्या निविदेची वाट इच्छुकांकडून पाहिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून म्हाडाने दुकानांची सोडतच काढली नसल्याने अंदाजे 200 दुकाने धूळखात पडून होते.
आता अखेर मंडळाने दुकानांच्या विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे 200 दुकाने विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार असून या दुकानांच्या किंमती निश्चित होणे बाकी आहे. त्यामुळे किंमती ठरल्या की दुकानांच्या निविदेची तारीख जाहिर करण्यात येईल, असेही लाखे यांनी सांगितले आहे. दरम्यान 2010 मध्ये मुंबई मंडळाने 169 दुकानांसाठी निविदा काढल्या होत्या. त्यानंतर मात्र मंडळाला दुकानांचा विसर पडला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा