एमएमआरसीला अखेर सुचलं शहाणपण

 Aarey Colony
एमएमआरसीला अखेर सुचलं शहाणपण
Aarey Colony, Mumbai  -  

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने अखेर आरे युनिट-19 मधील माती परिक्षणाचे काम बंद केले आहे. कंत्राटदाराने बुधवारी काम  बंद करत यंत्रसामग्री आणि कामगारांसह गाशा गुंडाळला आहे. नियमांचे उल्लंघन करत मनमानी करणाऱ्या एमएमआरसीला पर्यावरण प्रेमींनी दणका दिल्यानंतर अखेर एमएमआरसीने माघार घेतली आहे.

आरे कास्टिंग यार्डची तीन हेक्टरची जागा वगळता इतरत्र आरेत कुठेही कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नाही, असे म्हणत राष्ट्रीय हरित लवादाने आरेतील मेट्रो-3 च्या कामास स्थगिती दिली आहे. असे असतानाही गेल्या आठवड्यात लवादाच्या आदेशाचा अवमान करत एमएमआरसीने बेकायदेशीररित्या युनिट 19 मध्ये माती परिक्षणाचे काम सुरू केले. या कामाला स्थानिक तबेला मालकांचा आणि पर्यावरण प्रेमींचा विरोध होईल, या भीतीने पोलीस फौजफाट्यासह काम सुरू केले होते. मात्र चार-पाच दिवसांतच एमएमआरसीला हे काम अखेर बंद करावे लागले आहे.

सेव्ह ट्री, सेव्ह आरे आणि इतर पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत शनिवारी आरे पोलीस ठाण्यात एमएमआरसीविरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या तक्रारीचा धसका घेत एमएमआरसीने काम बंद करण्याचा निर्णय घेतला व बुधवारी रात्री गाशा गुंडाळल्याची माहिती पर्यावरण प्रेमी झोरू बाथेना यांनी दिली आहे.

Loading Comments