Advertisement

नवी मुंबईकरांना वीजबील हप्त्याने भरता येणार, महावितरणचा दिलासा

अव्वाच्या सव्वा पाठवले वीजबील हप्त्याने भरण्याची सवलत आता नवी मुंबईकरांना महावितरणने दिली आहे.

नवी मुंबईकरांना वीजबील हप्त्याने भरता येणार, महावितरणचा दिलासा
SHARES
अव्वाच्या सव्वा पाठवले वीजबील हप्त्याने भरण्याची सवलत आता नवी मुंबईकरांना महावितरणने दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. महावितरणकडून विशेष सवलत मिळावी यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी घेतलेल्या महावितरण विभागाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 


नवी मुंबईसह पनवेल महापालिका क्षेत्रातील वीजग्राहकांना महावितरण कंपनीने तब्बल ४ पट वाढीव वीजबिल पाठवलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा झटका बसला आहे.  लॉकडाऊनच्या काळात आलेली बेरोजगारी आणि त्यात भरीला अव्वाच्या सव्वा वीजबील यामुळे नवी मुंबईतील रहिवाशी संतप्त झाले आहेत. महावितरणाच्या या मनमानी कारभाराचा रहिवाशांनी तीव्र निषेध केला आहे.


नवी मुंबईसह पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली येथील रहिवाशांना चालू महिन्यात भरमसाठ वीजबिले वितरित करण्यात आलेली आहेत. ही बिले मीटरची रिडींग न घेता सरासरी काढण्यात आले असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. तिप्पट, चौपट वीजबिले आली असल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोरोनामुळे मागील तीन महिने लॉकडाऊन आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक मध्यमवर्गीयांचा पगारही झालेला नाही. अशा बिकट परिस्थितीत महावितरणने ३  महिन्याचे एकत्रित २५ हजार रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बिले वितरित केली आहेत.  दुकाने, कंपन्या बंद असूनही त्यांना सरासरी बिलाच्या नावाखाली अवाढव्य बिलं पाठवली आहेत. 


नवी मुंबई शहरातील वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत शिवसेना खासदार राजन विचारे यांनी शुक्रवारी  सिडको गेस्ट हाऊस येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. महावितरणने अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत याबाबत विचारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


लॉकडाऊनमध्ये नागरिक अडचणीत आहेत. त्यामुळे बिल थकबाकीदारांचे कनेक्शन कट करू नका, ग्राहकांना बिलाची थकबाकी भरण्यासाठी हप्ते पाडून द्या, अशा सूचना त्यांनी महावितरणला केल्या. त्या सर्व मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी मान्य केल्या आहेत. वाढीव आलेली बिले कमी करण्यासाठी आणि ज्यांना वीजबिल एकदम भरता येणार नाही, त्यांना बिलाचे हप्ते पाडून देण्यासाठी नवी मुंबई तीन विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.



हेही वाचा -   

कोपरखैरणे, तुर्भेमधील रुग्णवाढ चिंताजनक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा