
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या कामासाठी अदानी समूहातील एका कंपनीची निवड करण्यात आली आहे.
तब्बल 1,700 कोटी रुपयांचे हे काम या कंपनीकडे सोपवले जाणार आहे. यात सीएसटी रोड, कुर्ला ते माहिम कॉजवे दरम्यान संरक्षक भिंत आणि सर्व्हिस रोड बांधकाम, तसेच ड्रेनेज चॅनेल टाकण्यासारखी अनेक कामे समाविष्ट आहेत.
2005 मधील अतिवृष्टीदरम्यान आलेल्या महापुरामुळे मिठी नदी चर्चेत आली होती. 2019 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ‘मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प’ हाती घेतला.
नदीची वाहून नेण्याची आणि पाणी थोपवण्याची क्षमता वाढवण्यासाठी नदी खोल करणे, जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून टनेल बांधणे, कृत्रिम तलाव व ओलसर जमीन (वेटलँड) विकसित करणे, आणि नदी वर्षभर प्रवाही ठेवणे यांसारखी कामे करण्यात येणार आहेत.
मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीने तज्ज्ञ सल्लागार नेमले होते. या सल्लागारांनी सादर केलेल्या तांत्रिक आणि व्यवहार्यता अहवालानुसार अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवण्यात आले. त्यांनी चार टप्प्यांमध्ये विविध कामांची शिफारस केली असून, त्यातील तिसऱ्या टप्प्याचे काम गेल्या काही वर्षांपासून निविदा प्रक्रियेत अडकले होते. आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम अदानी समूहाला देण्यात येणार आहे.
अदानी कंपनीने बीएमसीने ठरवलेल्या प्रकल्प खर्चापेक्षा 7.7 टक्के जास्त दराने बोली लावली होती. त्यामुळे महानगरपालिकेला आणखी साधारण 100 कोटी रुपये जादा खर्च येणार असल्याची माहिती बीएमसीतील सूत्रांनी दिली.
बीएमसीने या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी पुन्हा एकदा निविदा मागवल्या होत्या. प्राप्त प्रतिसादानुसार अदानी कंपनीची निवड करण्यात आली. या कामाचा एकूण अंदाजित खर्च 1,700 कोटी रुपये आहे.
अतिरिक्त आयुक्त अभिजित बंगार यांनी लवकरच कामाचे आदेश दिले जाऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.
या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक महत्त्वाची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यात सीएसटी रोड, कुर्ला ते माहिम कॉजवेपर्यंत नदीकिनारी संरक्षक भिंत आणि सर्व्हिस रोड बांधणे, वादळपाण्यासाठी ड्रेनेज चॅनेल टाकणे, मलनिस्सारण नियंत्रित करण्यासाठी इंटरसेप्टर गेट पंप बसवणे यांचा समावेश आहे.
नदीकिनारी यंत्रसामग्री आणि उपकरणांची वाहतूक सुलभ करण्यासाठी ॲक्सेस रोड तयार केले जातील. तसेच, मुंबईकरांसाठी मरीन ड्राइव्हसारखा पादचारी प्रोमेनेडही विकसित केला जाणार आहे.
मिठी नदीची एकूण लांबी 17.84 किमी असून, यापैकी 11.84 किमी भाग बीएमसीच्या हद्दीत तर 6 किमी भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) ताब्यात येतो.
