Advertisement

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला भार सोसवेना


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला भार सोसवेना
SHARES

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाहनांचा वाढता भार द्रुतगती मार्गाला सोसवेना झाल्याची माहिती नुकतीच एका अहवालाद्वारे समोर आली आहे. वाहनांच्या अतिभारामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे द्रुतगती मार्गावरील अंदाजे 8 हजार पॅनलला तडे गेले आहेत.

पॅनलच्या दुरूस्तीचे काम सुरू असून हा देखभालीचा, दैनंदिन कामाचा भाग असून त्यामुळे द्रुतगती मार्गाला कोणताही धोका नाही.

एस. जी. मुंगलीवार, कार्यकारी अभियंता एमएसआरडीसी, (पुणे)

द्रुतगती मार्गावरून दररोज 50 हजार वाहने धावतात. यात अतिजड वाहनांचा मोठ्या संख्येने समावेश असतो. द्रुतगती मार्गाच्या पॅनलला तडे गेल्याचे गेल्या वर्षी निर्दशनास आले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने त्वरीत पॅनलच्या दुरूस्तीचे काम सुरू केले. त्याचवेळी संपूर्ण द्रुतगती मार्गावर किती ठिकाणी तडे गेले आहेत, हे शोधून काढण्यासाठी एक सदस्यीय समितीची नेमणूक एमएसआरडीसीने केली होती. या समितीने डिसेंबर 2016 ते मार्च 2017 या काळात द्रुतगती मार्गाचा अभ्यास करत यासंबंधीचा अहवाल नुकताच एमएसआरडीसीकडे सादर केला आहे. या अहवालानुसार दीड लाख पँनलपैकी 8 हजार पॅनलला तडे गेले आहेत. एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक के. व्ही. कुरूंदकर यांना हा अहवाल सादर झाला असून त्यांनी पॅनलला तडे गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अतिभार आणि बदलत्या वातावरणामुळे पॅनलला तडे गेल्याचेही अहवालात नमूद केल्याचे स्पष्ट केले आहे.

पॅनलच्या दुरूस्ती-देखभालीचे काम हे दैनंदिन आहे. मात्र एक-एक पॅनल शोधत त्याची दुरूस्ती करण्याऐवजी एकाच वेळी सर्व पॅनलची तपासणी करत एक निश्चित आकडा काढून मग नियोजनबद्ध दुरूस्ती करण्याच्या उद्देशाने हा अभ्यास केल्याचेही कुरूंदकर यांनी सांगितले. तर कुठल्या पॅनलची कशी दुरूस्ती करायची, याच्या उपाययोजनाही अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पॅनल दुरूस्तीचे काम सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियता मुंगलीवार यांनी दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा