आता तुम्हीच ठरवा, शौचालयांचं रेटिंग


आता तुम्हीच ठरवा, शौचालयांचं रेटिंग
SHARES

मुंबई - मुंबई महानगर पालिकेचं शौचालय म्हटलं की, डोळ्यासमोर दुर्गंधी, अस्वच्छता उभी राहते. त्यामुळेच पालिका शौचालयांचा हा सुमार दर्जा सुधारत नागरिकांना शौचालयाची उत्तम सेवा पुरवण्यासाठी पालिकेनं विविध उपाययोजना हाती घेतल्यात. त्याचाच भाग म्हणून आता पालिकेनं शौचालयांमध्ये रेंटिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेतलाय. हे रेटिंग मशीन एखादे शौचालय स्वच्छ आहे, ठिक आहे की अस्वच्छ आहे हे ठरवणार आहे. त्याही पेक्षा या रेटिंग मशीनच्या माध्यमातून नागरिकच शौचालयाचे रेटिंग ठरवणार आहेत. या मशीनमध्ये बसवण्यात आलेल्या स्वच्छ, ठिक आणि अस्वच्छ या तीन बटणांपैकी एक बटण दाबत नागरिकांना शौचालयाचा दर्जा ठरवता येणार आहे.

पालिकेने या योजनेला सुरूवात केली असून पहिलं रेटिंग मशिन छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ भाटिया बागेच्या समोर असणाऱ्या शौचालयात बसवण्यात आल्याची माहिती ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिलीय. तर लवकरच अन्य उर्वरित शौचालयांमध्येही असं रेटिंग मशीन बसवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या रेटिंग मशीन अंर्तगत ज्या शौचालयाचा दर्जा अस्वच्छ ठरेल त्या शौचालयाविरोधात दंडात्मक कारवाई करत शौचालयाचा दर्जा सुधारण्यास भाग पाडण्यात येणार आहे. पालिकेच्या या योजनेमुळे शौचालयांचा दर्जा आता नक्कीच सुधारेल अशी आशा व्यक्त नागरिकांनी व्यक्त केलीय.

 

संबंधित विषय