Advertisement

अखेर हिमालय पूलाच्या पुनर्बाधणीला मुहूर्त मिळणार

तब्बल २ वर्षांनंतर अखेर या पुलाच्या पुनर्बाधणीला मुहूर्त मिळणार आहे.

अखेर हिमालय पूलाच्या पुनर्बाधणीला मुहूर्त मिळणार
SHARES

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उपनगरी रेल्वे स्थानकालगत असलेल्या हिमालय पूल कोसळण्याच्या दुर्घटनेला २ वर्षे पूर्ण झाली. तब्बल २ वर्षांनंतर अखेर या पुलाच्या पुनर्बाधणीला मुहूर्त मिळणार आहे. या पुलासाठी कंत्राटदार निश्चितीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, पुलाच्या पुनर्बाधणीसाठी ६ कोटी खर्च येणार आहे.

या पुलाचा सांगाडा गंजू नये म्हणून स्टीलची तुळई टाकण्यात येणार आहे. सध्या याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. २ वर्षांपूर्वी १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळच्या हिमालय पुलाचा भाग भर रस्त्यात कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचे बळी गेले तर ३० जण जखमी झाले.

या दुर्घटनेनंतर पूल विभागातील ३ अभियंत्यांना अटकही करण्यात आली होती. या पुलाच्या दुर्घटनेमुळं महापालिकेवर प्रचंड टीका झाली तसेच रेल्वे प्राधिकरणावरही आरोप झाले. डी. एन. मार्गावर असलेला हिमालय पूल पडल्यानंतर गेल्या २ वर्षांपासून हे प्रवासी रस्ता ओलांडून जात होते. वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर पादचारी पूल बांधण्याची गरज होती. त्यामुळे महापालिकेनं पुन्हा त्याच जागी तसाच पूल बांधण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निविदाही मागवल्या होत्या.

या पुलाची पुनर्बाधणी करण्यासाठी कंत्राटदार पुढे आले असून कंत्राटदार निश्चित करण्यासाठी पूल विभागाने प्रस्ताव तयार के ला आहे. पुलाच्या पुनर्बाधणीसाठी पालिकेला सहा कोटी खर्च येणार असून सध्या हा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

हिमालय पूल पडल्यानंतर केलेल्या पाहणीत हा पूल गंजल्याचे आढळले होते. त्यामुळे या पुलासाठी स्टीलची तुळई (गर्डर) टाकण्याचं महापालिकेनं ठरवलं आहे. दक्षिण मुंबईत खाऱ्या हवेमुळे धातू गंजण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळं या पुलाच्या अधिक मजबुतीसाठी स्टीलचे गर्डर वापरण्यात येणार आहे. या पुलाला आधीच्याच ठिकाणी उतरण्यासाठी जिने असतील. या पुलासाठी सरकत्या जिन्यांचा विचार पुढे आला होता. मात्र त्याच्या देखभालीचा खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळं पारंपरिक पद्धतीनं जिने तयार करण्यात येणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा