म्हाडात लवकरच पाळणाघर

 Mumbai
म्हाडात लवकरच पाळणाघर

मुंबई - म्हाडातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना आपल्या लहान मुलांना खासगी पाळणाघरात वा घरी कुणाकडे तरी ठेऊन कामावर यावे लागते. महिला कर्मचाऱ्यांची ही अडचण लक्षात घेत म्हाडाने म्हाडा कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडाचे सचिव डॉ. भारत बास्टेवाड यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे.

प्रत्येक कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर असावे, असे मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यानुसार अनेक खासगी कार्यालयात पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करून घेण्यात आल्याचे पाहायला मिळते. मात्र त्याचवेळी मुंबईतील कुठल्याही सरकारी कार्यालयांमध्ये मात्र महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. आता मात्र म्हाडाने यादृष्टीने पहिले पाऊल उचलत पाळणाघर सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या पाळणाघरासाठी आवश्यक ती आर्थिक तरतुद करण्यात येणार आहे. तर या पाळणाघरात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी असतील आणि त्यांना सांभाळण्यासाठी दोन महिला कर्मचारी असतील. तर या पाळणाघराची रंगरंगोटी लहान मुलांना आकर्षित करणारी अशी असणार आहे. मुलांना आवश्यक त्या सर्व सुविधा या पाळणाघरात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही बास्टेवाड यांनी स्पष्ट केले आहे. तर अशाप्रकारे सरकारी कार्यालयात पाळणाघर सुरू करणारी म्हाडा हे पहिले सरकारी कार्यालय असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. तर महिला कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाल्याचेही स्पष्ट केले आहे.

Loading Comments