Advertisement

बीडीडीकडे विशेष लक्ष, पण मोतीलाल नगरकडे दुर्लक्ष


बीडीडीकडे विशेष लक्ष, पण मोतीलाल नगरकडे दुर्लक्ष
SHARES

गेल्या 20 वर्षांपासून रखडेलला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अवघ्या काही महिन्यांतच म्हाडाने मार्गी लावला. याबद्दल म्हाडाचे कौतूक आहेच, पण त्याचवेळी म्हाडाने स्वत:च्या वसाहतींच्या पुनर्विकासाकडेही तितकेच लक्ष देत पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याची गरज असल्याचे म्हणत मोतीलाल नगरमधील रहिवाशांनी म्हाडाच्या उदासीन धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सुमारे 127 एकरवर वसलेल्या मोतीलाल नगरच्या पुनर्विकासातून म्हाडाला अंदाजे 22 हजार अतिरिक्त घरे मिळणार असून, म्हाडा वसाहतींपैकी हा सर्वात मोठा पुनर्विकास मानला जातो. मात्र याच मोठ्या पुनर्विकासाकडे म्हाडाचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकल्प रखडला आहे.

गोरेगावमध्ये मोतीलाल नगर 1, 2 आणि 3 वसलेले आहे. या म्हाडा वसाहतीत अंदाजे 3,700 रहिवाशी राहतात. मोतीलाल नगरमध्ये रहिवाशांनी अतिरिक्त बांधकाम केले असून, हे बांधकाम अनधिकृत असल्याचे म्हणत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनधिकृत बांधकाम म्हाडाने पाडावे अथवा तसे होऊ द्यायचे नसेल तर म्हाडाने वसाहतीचा पुनर्विकास करावा, असा आदेश 2013 मध्ये दिला होता. 

त्यानंतर म्हाडाने पुनर्विकासाची जबाबदारी घेत त्यासंबंधीचा आराखडाही तयार करत मोतीलाल नगरवर हातोडा न पाडता रहिवाशांना दिलासा दिला खरा, पण चार वर्षे होत आली तरी पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आराखडा तयार करण्यात आणि प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करण्यातच म्हाडाने चार वर्षे वाया घालवली आहेत.

बीडीडीप्रमाणे म्हाडाने स्वत: विकास करावा
चार वर्षांपासून हा पुनर्विकास रखडला असून, तो त्वरीत मार्गी लावावा एवढीच मागणी आहे. म्हाडाचा सर्वात मोठा प्रकल्प असून, या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे. त्यामुळे म्हाडाने बीडीडीप्रमाणे स्वत: कंत्राटदार नेमून पुनर्विकास करावा. त्यातून अधिकाधिक परवडणारी घरे निर्माण करावीत, अशी मागणी आम्ही म्हाडाकडे सातत्याने करत आहोत. पण म्हाडाकडून मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाकडे लक्षच दिले जात नसल्याचे चित्र आहे. म्हाडाला जर पुनर्विकासात लक्ष द्यायचे नसेल तर, रहिवासी स्वयंपुनर्विकास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आम्हाला पुनर्विकासाची परवानगी द्यावी. अऩ्यथा त्वरीत पुनर्विकास मार्गी लावावा.
निलेश प्रभू, सरचिटणीस, मोतीलालनगर विकास समिती

प्रकल्प लवकरच मार्गी लावू
प्रकल्प मार्गी लावण्यास विलंब झाला आहे, हे खरे आहे.  तांत्रिक अडचणीमुळे आणि हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रकल्पास विलंब होतोय, हे ही तितकेच खरे आहे. सध्या मे. शिखरे कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून लवकरच या कंपनीकडून पुनर्विकास आराखड्याच्या आणि नियोजनाच्या कामाला सुरूवात होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. यात काही वेळ जाणार हे निश्चित. पण शक्य तितक्या लवकर हा पुनर्विकास मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
डी. के. महाजन, कार्यकारी अभियंता, गोरेगाव, मुंबई मंडळ, म्हाडा

मोतीलाल नगरचा पुनर्विकास मार्गी लागल्याबरोबर विक्रोळीतील कन्नमवार नगरचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात येईल, असे म्हाडाने तीन-चार वर्षांपूर्वी जाहीर केले होते. मोतीलाल नगरचाच पुनर्विकास पुढे रेटत नसल्याने टागोर नगरचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे टागोर नगरचा म्हाडाला पूर्णत: विसरच पडला आहे. टागोर पुनर्विकासातून म्हाडाला अंदाजे 16 हजार अतिरिक्त घरे मिळणार आहेत. दरम्यान बीडीडीतील 13 हजार घरांच्या तुलनेत मोतीलाल नगर आणि टागोर नगरमधून 35 हजारांहून अधिक घरे मिळणार असल्याने म्हाडाने या प्रकल्पांकडेही बीडीडीप्रमाणेच लक्ष द्यावे, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा