Advertisement

वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास निविदेला पुन्हा मुदतवाढ


वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास निविदेला पुन्हा मुदतवाढ
SHARES

वरळी, बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काढण्यात आलेल्या निविदेला पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. बिल्डरांच्या मनात या प्रकल्पाविषयी अनेक शंका असल्यानेच बिल्डर पुढे येत नसल्याने निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा होत आहे. असे काहीच झालेले नसून प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे मत मुंबई मंडळाने मांडला आहे. तसेच बिल्डरांना काही तांत्रिक अडचणी असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे मुंबई मंडळाने स्पष्ट केले आहे.

ना. म. जोशी आणि नायगाव येथील पुनर्विकासाचे कंत्राट याआधीच देत तेथील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वरळीतील पुनर्विकासासाठी एप्रिलमध्ये निविदा काढण्यात आल्या. पण या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने निविदेला पहिल्यांदा मुदतवाढ दिली. या मुदतवाढीनुसार 16 जूनपर्यंत बिल्डरांना निविदा सादर करण्याची मुदत दिली होती. पण ही मुदत संपण्याआधीच अर्थात 16 जूनच्या आधी आठ दिवसांपूर्वीच या निविदेला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. बिल्डरांना निविदा सादर करण्यास काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे पाच ते सहा बिल्डरांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आठ दिवसांपूर्वीच मुदतवाढ देण्यात आली असून आता निविदा सादर करण्यासाठी 17 जुलै अशी डेडलाईन देण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मात्र बिल्डरांनी रहिवाशांच्या विरोधाचा धसका घेतला आहे. निविदेतील काही जाचक अटींमुळेही बिल्डर पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच मोठ्या काळानंतर कंत्राटदाराला म्हाडाकडून पैसे दिले जाणार असून हे बिल्डरांना परवडणारे नाही. त्यामुळे बिल्डर मागे पुढे करत असल्याचीही चर्चा आहे. म्हाडातील संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना या चर्चा चुकीच्या असल्याचे म्हणत केवळ तांत्रिक अडचणीमुळे निविदेला मुदतवाढ द्यावी लागत असल्याचा पुनरूच्चार केला आहे. तेव्हा 17 जुलै रोजीच म्हाडाचा हा दावा किती खरा आहे, किती बिल्डर पुढे येतात हे समजेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा