Advertisement

मुंबईत ११ वर्षांनंतर रंगणार फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा


मुंबईत ११ वर्षांनंतर रंगणार फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा
SHARES

तब्बल ११ वर्षांनंतर मुंबईत पुन्हा एकदा फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेचा दम घुमणार अाहे. याअाधी ११ वर्षांपूर्वी कबड्डीमहर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांच्या स्मरणार्थ शिवाजी पार्कवर या स्पर्धेचे अायोजन करण्यात अाले होते. ९ ते १२ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत नुकतंच राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची मात्र प्रतिष्ठा पणाला लागणार अाहे. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांच्या संघटनेने या स्पर्धेचे शिवधनुष्य पेलले असून भव्यदिव्य पद्धतीने या स्पर्धेचे अायोजन करण्यात येणार अाहे. पुरुष अाणि महिला गटात प्रत्येकी अाठ संघ सहभागी होणार अाहेत. गोरेगाव येथील एसअारपीएफ मैदानात (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ) ही स्पर्धा रंगणार अाहे.


राष्ट्रीय स्पर्धेतील अव्वल अाठ संघच खेळणार

राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारणाऱ्या संघांनाच फेडरेशन चषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. पुरुषांमध्ये राष्ट्रीय विजेता महाराष्ट्र, उपविजेता सेनादल, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, भारतीय रेल्वे, राजस्थान अाणि उत्तराखंड हे संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी झुंजतील. महिलांमध्ये यजमान महाराष्ट्रासह राष्ट्रीय विजेता हिमाचल प्रदेश, उपविजेता भारतीय रेल्वे या संघांसह उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ, हरियाणा अाणि छत्तीसगढ हे संघ खेळताना दिसतील.


पुरुष-महिलांसाठी वेगळी मैदाने

प्राथमिक सामने साखळी व बाद पद्धतीने खेळवण्यात येणार असून असून संघांची चार गटात विभागणी करण्यात अाली अाहे. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी मैदाने असतील, त्यामुळे प्रेक्षकांना एकाच वेळी दोन सामने पाहण्याचा लाभ उठवता येईल.


दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी

रिशांक देवाडिगा, गिरीश इर्नाक, नितीन मदने, विकास काळे (महाराष्ट्र), अनुप कुमार, मनजित छिल्लर, सुरिंदर नाडर, रविन्दर पहल, राजेश नरवाल (हरियाणा), दीपक हूडा, वझीर सिंग, विकास दहिया (राजस्थान), मोहित छिल्लर, राजेश मोंडल, रोहित कुमार, श्रीकांत जाधव (भारतीय रेल्वे), जीवा कुमार, प्रशांत राय, सुकेश हेगडे, शब्बीर बापू, प्रपंजन (कर्नाटक), सुरजीत सिंग, नितीन तोमर, मोनू गोयत (सेनादल) असे रथी-महारथी आपले कसब पणाला लावणार आहेत. तसंच महिलांमध्ये महाराष्ट्राची अभिलाषा म्हात्रे, कोमल देवकर, पूजा शेलार, रेल्वेच्या तेजस्विनी बाई, रक्षा नारकर, सोनाली शिंगटे अशा खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मुंबईकर चाहत्यांना मिळणार अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा