कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर, कोल्हापूर अजिंक्य!


कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर, कोल्हापूर अजिंक्य!
SHARES

२९ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किशोरी गटात मुंबई उपनगरने तर किशोर गटात कोल्हापूरने बाजी मारत विजय मिळवला आहे. कोल्हापूर दोन्ही गटात अंतिम फेरीत दाखल झाले होते. परंतु त्यांना समिश्र यशावर समाधान मानावे लागले. किशोरी गटात गत विजेते पुणे उपांत्य फेरीत, तर परभणी अंतिम फेरीत पराभूत झाले.


मुंबईच्या खेळाडूंसमोर होते कडवे आव्हान

अलिबाग-रायगड येथील पी. एन. पी. शैक्षणिक संकुलात झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने कोल्हापूरचे कडवे आव्हान २७-२३ असे मोडून काढले. या सामन्यात राजश्री चंदन पांडे हीने चमकदार कामगिरी करत फिरता चषक आपल्याकडे खेचून आणला. मध्यंतराला १७-०९ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या उपनगरला नंतर मात्र कोल्हापूरने चांगलीच झुंज दिली. ५ मिनिटे शिल्लक असताना २२-१६ अशी उपनगरकडे आघाडी होती. शेवटची दीड मिनिटे शिल्लक असताना उपनगरचे तीन खेळाडू मैदानात होते आणि अवघ्या दोन गुणांची आघाडी त्यांच्याकडे होती. या संधीचा लाभ कोल्हापूरला घेता आला नाही. तीन खेळाडूंत कोल्हापूरच्या चढाईपटूची अव्वल पकड (सुपर कॅच) झाली. येथेच सामना पुन्हा उपनगरच्या बाजूने झुकला. या विजयाचे श्रेय करीना कामतेकर, शुभदा खोत, शर्वरी गोडसे यांच्या कल्पक आणि संयमी खेळाला जाते. ऋतुजा कडलग, प्रतिक्षा पाटील, प्रांजल पवार यांनी कोल्हापूरचा पराभव टाळण्यासाठी शर्थीची लढत दिली.


मुलांच्या अंतिम लढतीत कोल्हापूर विजयी

मुलांच्या अंतिम लढतीत कोल्हापूरने गत विजेत्या परभणीचा दुबळा प्रतिकार ३६-१९ असा मोडून काढत प्रभाकर पाटील या कबड्डीपटूने फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत झंजावती खेळ करणाऱ्या परभणीला अंतिम सामन्यात मात्र सूर सापडला नाही. कोल्हापूरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मध्यांतरापर्यंत १७-०८ अशी आघाडी राखली. नंतर देखील सावध खेळ करत ही आघाडी वाढवत १५ गुणांनी सामना सहज जिंकला. या विजयात तेजस पाटील याचा सिंहाचा वाटा आहे. त्याला अभय बाबर यांनी चढाईत तर सौरभ इंगळे, अमोल चव्हाण यांनी पकडीत मोलाची साथ दिली. परभणीच्या माहिब शेख, हनुमान शिंदे, करण गायकवाड यांची या सामन्यात डाळ शिजली नाही.

या आधी झालेल्या मुलींच्या उपांत्य फेरीत मुंबई उपनगरने मुंबई शहरचा ३८-३४,तर कोल्हापूरने गत विजेत्या पुण्याचा ४३-२६ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. मुलांच्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरने ठाण्याला ४५-३१, तर परभणीने मुंबई उपनगरला २७-२२ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

संबंधित विषय