Advertisement

कुर्ला किंग्सचा महामुंबई कबड्डी लीगच्या विजेतेपदावर कब्जा


कुर्ला किंग्सचा महामुंबई कबड्डी लीगच्या विजेतेपदावर कब्जा
SHARES

महामुंबई कबड्डी लीगचा अंतिम सामना चुरशीचा झाला. शेवटच्या चढाईपर्यंत विजेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हा सस्पेन्स कायम होता. अखेर शेवटच्या चढाईत निनाद तावडे गुण मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःच लाॅबीबाहेर पडला अाणि कुर्ला किंग्सचे विजेतेपदाचे स्वप्न साकार झाले. कुर्ला किंग्सने २५-२३ अशा फरकासह डी अँड डी टायटन्सवर विजय मिळवून पहिल्यावहिल्या महामुंबई कबड्डी लीगच्या विजेतेपदावर नाव कोरले. निनाद तावडे भलेही डी अँड डी टायटन्सला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला असला तरी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला. दादा अाव्हाडला सर्वोत्तम चढाईपटू तर धीरज धरीवलेने सर्वोत्तम पकडीचा पुरस्कार पटकावला.


चढाया, पकडींचा भन्नाट खेळ

कांदिवलीतील चारकोप येथील नामदेवराव कदम क्रीडानगरीत रंगलेल्या या अंतिम सामन्यात निनाद अाणि अाकाश गायकवाड यांनी वेगवान चढाया करत पहिल्या दोन मिनिटांतच डी अँड डी टायटन्सला ४-० अशी अाघाडी मिळवून दिली. संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त चढाया करणाऱ्या दादा अाव्हाडच्या तीन वेळी पकडी करत डी अँड डी टायटन्सने अापली ताकद दाखवून दिली. त्यामुळे सुरुवातीलाच टायटन्सने १४-७ अशी अाघाडी घेतली होती.


कुर्ला किंग्सची पिछाडीवरून मुसंडी

शेवटची पाच मिनिटे असताना २१-१६ असे अाघाडीवर असलेल्या डी अँड डी टायटन्सवर कुर्ला किंग्सने लोण चढवला अाणि सामन्यात रंगत अाणली. कुर्ला किंग्सने २२-२२ अशी बरोबरी साधत नंतर सामन्यात पहिल्यांदाच २४-२३ अशी अाघाडी घेतली. अखेर निनाद तावडेनेच कुर्ला किंग्सला गुण बहाल करत डी अँड डी टायटन्सच्या विजेतेपदावर पाणी फेरले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा