Advertisement

मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाचा कबड्डी स्पर्धेत विजय


मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाचा कबड्डी स्पर्धेत विजय
SHARES

ठाणे येथे ६६व्या राज्यस्तरीय पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेत महिला गटातील शिवशक्ती महिला संघ मुंबर्इ शहर संघाने सलग चौथ्यांदा अंतिम विजेतेपद मिळवले आहे. तर, पुरूष गटात उजाला क्रीडा मंडळ ठाणे संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम विजेतेपद मिळवले. महिला गटातील अंतिम सामना शिवशक्ती महिला संघ विरुद्ध छत्रपती क्रीडा मंडळ डोंबिवली यांच्यात झाला. छत्रपती क्रीडा मंडळाच्या अक्षता मसुरकरे हिने सामन्यातील पहिली चढार्इ केली. सामन्यातील तिसरी चढार्इ छत्रपती क्रीडा मंडळाच्या स्वप्ना साखळकरनं केली. परंतु शिवशक्ती महिला संघाच्या ऋतुजा बांदेवडेकर हिने आपल्या संघाचे गुणांचे खाते उघडले. शिवशक्ती महिला संघाची पहिली आणि तिसरी चढार्इ श्वेता राणेनं केली आणि तिने बोनस म्हणून अधिक एका गुणांची कमार्इ केली. हा सामना मध्यंतरापर्यंत अतिशय धीम्या गतीनं चालला. मध्यंतराला दोन्ही सघांचे 7-7 असे समसमान गुण होते. पण मध्यंतरानंतर शिवशक्ती महिला संघाच्या श्वेता राणेनं अतिशय खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. अशा प्रकारे शिवशक्ती संघ 17-15 अशा स्कोअरसह 2 गुणांनी जिंकला आणि स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मिळवले.

तसेच पुरूष गटात श्रीराम कबड्डी संघाच्या नितीन शेगर याने सामन्यातील पहिली चढार्इ केली. तर, सामन्यातील पहिला गुण उजाला क्रीडा मंडळाच्या अक्षय भोर्इर याने बोनस टाकून मिळवला. सामन्यात उजाला क्रीडा मंडळानं अतिशय आक्रमक खेळ करीत मध्यंतराला 21-7 अशी 14 गुणांची आघाडी घेतली. परंतु मध्यंतरानंतर श्रीराम कबड्डी संघाच्या नितीन शेगर आणि नरेश दिंडले यांनी आक्रमक चढाया करीत भराभर गुण मिळवले. 

सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना उजाला क्रीडा मंडळाकडे फक्त 4 गुणांची आघाडी शिल्लक होती. परंतु, पिंटु पाटीलने पुन्हा आपल्या अष्टपैलु खेळाची चुणूक दाखवत आपल्या संघाचा विजय निश्चित केला. तरी या झालेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पौर्णिमा जेधे, शिवशक्ती महिला संघ (मुंबई) आणि अर्चना करडे, छत्रपती क्रिडा मंडळ (डोंबिवली) या मानकरी ठरल्या तर परुष गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान श्रीराम कबड्डी संघाचे नरेश धिंडले आणि किरण धावडे यांना मिळाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा