बाल उत्कर्ष राज्यस्तरीय कबड्डीत स्वराज्य, एअर इंडिया उपांत्य फेरीत


  • बाल उत्कर्ष राज्यस्तरीय कबड्डीत स्वराज्य, एअर इंडिया उपांत्य फेरीत
SHARE

बाल उत्कर्ष क्रीडा मंडळातर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत पुरुषांमध्ये एअर इंडिया, भारत पेट्रोलियम, महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस या संघांनी उपांत्य फेरीत मजल मारली. महिलांमध्ये स्वराज्य, संघर्ष, महात्मा गांधी, शिव ओम यांनी उपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या व्यावसायिक गटात, एअर इंडिया वि भारत पेट्रोलियम, महिंद्रा वि. महाराष्ट्र पोलीस अशा तर महिलांमध्ये स्वराज्य वि संघर्ष, महात्मा गांधी वि शिव ओम अशा उपांत्य लढती रंगतील.

एअर इंडियाकडून यूनियन बँकेचा धुव्वा

मुंबईतील लालबाग येथील गणेश गल्ली मैदानावर सुरू असलेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात एअर इंडियाने यूनियन बँकेचा ३९-१४ असा धुव्वा उडवला. सुनील दुबले, उमेश म्हात्रे, दीपककुमार यांच्या झंझावाती खेळाने मध्यांतराला २०-०९अशी आघाडी घेणाऱ्या एअर इंडियाने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला.


महिंद्राकडून मुंबई महापालिका पराभूत

दुसऱ्या सामन्यात भारत पेट्रोलियमने मुंबई बंदरचा २६-१९ असा पराभव केला. महिंद्राने मुंबई महानगरपालिकेचा प्रतिकार ३६-२३ असा मोडीत काढला. अजिंक्य पवार,शेखर तटकरे, स्वप्नील शिंदे महिंद्राकडून, तर आकाश कदम, राहुल खाटीक, सुनील मोकलं पालिकेकडून उत्कृष्ट खेळले. महाराष्ट्र पोलीसने देना बँकेचे आव्हान ३४-२७ असे मोडून काढत उपांत्य फेरी गाठली. 


स्वराज्यने बलाढ्य शिवशक्तीला हरवले

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात उपनगरच्या स्वराज्यने बलाढ्य शिवशक्तीला २१-२० असे चकवित उपांत्य फेरी गाठली. स्मिता पांचाळ, राणी उपहार यांनी धारदार चढाया करीत अाणि श्रुतिका घाडीगावकर, शर्वरी गोडसे यांनी धाडसी पकडी करीत स्वराज्यकडे हा विजय खेचून आणला. उपनगरच्या संघर्षने मुंबई पोलिसांचे आव्हान २८-२० असे संपविले. उपनगरच्या महात्मा गांधीने पुण्याच्या एम. एस. स्पोर्ट्सचा ५०-१५ असा धुव्वा उडविला. पूजा किणी, प्रतीक्षा मांडवकर, तृप्ती सोनावणे यांच्या तुफानी खेळामुळे हे शक्य झाले. पुण्याच्या शिव ओमने पालघरच्या कुर्लाईचा चुरशीच्या लढतीत ३२-२८ असा पाडाव केला.


हेही वाचा -

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादल, भारतीय रेल्वेला विजेतेपद 

संबंधित विषय
ताज्या बातम्या