Advertisement

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादल, भारतीय रेल्वेला विजेतेपद


फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादल, भारतीय रेल्वेला विजेतेपद
SHARES

क्षणाक्षणाला सामन्याचे पारडे झुकवणाऱ्या चुरशीच्या झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेने हिमाचल प्रदेशचा अवघ्या एका गुणाने पराभव करून तिसऱ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेवर अापली मोहोर उमटवली. पुरुषांच्या सामन्यात मात्र सुरुवातीपासूनच सेनादलाने सामन्यावर वर्चस्व गाजवले होते. मात्र कर्नाटकने अखेरच्या क्षणी कडवी लढत देऊन सामन्यात रंगत निर्माण केली होती. पण शब्बीर बापूने केलेल्या घोडचुकीमुळे सेनादलाने तीन गुणांच्या फरकाने विजेतेपदावर कब्जा केला. विजेत्या सेनादल अाणि भारतीय रेल्वे संघाला शिवसेनेचे नेते अाणि युवासेनाप्रमुख अादित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाख रुपये देऊन गौरविण्यात अाले. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या सेनादल अाणि भारतीय रेल्वेने विजेतेपदाची कसर भरून काढली.



हिमाचलने अखेरच्या दोन चढाईत विजेतेपद गमावले

पूर्वार्धात लोण देत रेल्वेने मध्यंतराला १६-०९अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. उत्तरार्धात मात्र सामन्यात चुरस पहावयास मिळाली. हिमाचलच्या निधी शर्माने चढाईत गुण घेत व सारिकाने पकडी घेत सामन्याची पाच मिनिटे शिल्लक असताना रेल्वेवर लोण देत आघाडी कमी केली. अखेरच्या मिनिटात २५-२४ अशी बरोबरी असताना सोनाली शिंगटेने गुण मिळवून रेल्वेला बरोबरी साधून दिली. शेवटच्या चढाईत रेल्वेच्या पिंकी रॉयने निधी शर्माची पकड करीत रेल्वेला विजय मिळवून दिला.


शब्बीर बापूची घोडचूक कर्नाटकला भोवली

१०व्या मिनिटाला लोण देत सेनादलाने ११-०२ अशी आघाडी घेतली. नितीन तोमरने एकाच चढाईत ३ गडी बाद केल्यामुळे हा लोण झटपट झाला. मात्र विश्रांतीनंतर कर्नाटकच्या खेळाडूंनी टॉप गिअर टाकत खेळात जान आणली. त्यांनी सेनादलाच्या लोणची परतफेड करीत १८-१८ अशी बरोबरी साधली. त्यानंतरही सेनादलाचे दोन खेळाडू शिल्लक असताना कर्नाटकला लोण देण्याची संधी होती. पण गुण मिळवण्याच्या नादात शब्बीर बापूची सुपर टॅकल झाली अाणि सेनादलाला दोन गुण मिळाले. अखेरच्या क्षणी हेच दोन गुण सेनादलाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा