Advertisement

नात्यांची किंमत पटवून देणारा 'आम्ही दोघी'!

गरजेपेक्षा जास्त 'प्रॅक्टिकल' राहिल्यामुळे त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचं अगदी थेट जाऊन भिडणारं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळतं. आजच्या युगात नात्यांमधला ओलावा जपणं किती आवश्यक आहे, हे 'आम्ही दोघी' अगदी ठळकपणे अधोरेखित करतो.

नात्यांची किंमत पटवून देणारा 'आम्ही दोघी'!
SHARES

'आयुष्यात प्रॅक्टिकल रहायचं' असं म्हणणारी अनेक लोकं आपल्याल आसपास दिसतात. त्यातही, यामध्ये तरूणांचा भरणा अधिक असतो. अशाच एका 'प्रॅक्टिकल' रहाणाऱ्या व्यक्तिरेखेची कथा म्हणजे 'आम्ही दोघी'!

गौरी देशपांडे यांच्या 'आम्ही दोघी' या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. सावी(प्रिया बापट) आणि अमला(मुक्ता बर्वे) या दोघींची ही कथा. लहानपणीच आई गेल्यामुळे स्वावलंबी झालेली सावी मोठेपणी प्रचंड 'प्रॅक्टिकल' होते. नात्यांमधल्या इमोशन्सपेक्षाही तिला प्रॅक्टिकल डिसीजन्स जास्त भावतात. अशातच अमला अर्थात मुक्ता बर्वे तिच्या आयुष्यात प्रवेश करते आणि हळूहळू सावीला नात्यांमधला हळुवारपणा समजू लागतो. पण जोपर्यंत तिला तो समजतो, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.



गरजेपेक्षा जास्त 'प्रॅक्टिकल' राहिल्यामुळे त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचं अगदी थेट जाऊन भिडणारं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळतं. आजच्या युगात नात्यांमधला ओलावा जपणं किती आवश्यक आहे, हे 'आम्ही दोघी' अगदी ठळकपणे अधोरेखित करतो.

दोन तगड्या कलाकारांमुळे अभिनयाच्या बाबतीत आम्ही दोघी उजवा ठरतो. मोठेपणी प्रॅक्टिकल झालेली सावी प्रिया बापटने अगदी उत्तम वठवली आहे. पण लहानपणची सावीची भूमिका निभावण्यासाठी प्रिया बापटऐवजी दुसरी लहान कलाकार घेतली असती, तर ते अधिक वास्तववादी वाटलं असतं. वैचारिक भूमिका हा फोर्टे असलेल्या मुक्ता बर्वेने अमलाची जड भूमिका अगदी लिलया निभावली आहे.



मध्यांतरापूर्वी काही ठिकाणी चित्रपट बघताना काळाचा गोंधळ होतो. सावीची शाळा, तिचं घर, स्विमिंग क्लास यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ उडतो. शिवाय सावीच्या शाळेचे काही प्रसंग खूप लांबल्यासारखे वाटतात. पण त्याव्यतिरिक्त दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे हे प्रतिमा जोशींनी कुठेही जाणवू दिलेलं नाही. शिवाय, पात्रांच्या तोंडी असलेले संवाद प्रेक्षकांच्या मनात घोळत राहातात.

गुरू ठाकूर यांनी लिहिलेलं ‘कोणते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे’ हे एकमेव गाणं या चित्रपटात आहे. मात्र, चित्रपट संपल्यानंतरही गाण्याची चाल, त्याचे बोल प्रेक्षकांच्या ओठांवर राहातात.

थोडक्यात, एखाद्या साध्या सोप्या विषयाची सरळ साधी मांडणी म्हणजे आम्ही दोघी. आपल्या नात्यातील ओलावा, हळवेपणा टिकवून ठेवायचा असेल तर 'आम्ही दोघी' नक्की बघा!




Movie - Aamhi Doghi

Actors - Priya Bapat, Mukta Barve

Ratings - 3/5

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा