२३ वर्षांनंतर माधुरी-रेणुका एकत्र काम करणार!

तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकदा माधुरी दीक्षित-रेणुका शहाणे जोडीची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे या दोघी एका मराठी चित्रपटात एकत्र काम करणार आहेत!

SHARE

हम आपके है कौन हा चित्रपट म्हटला, की हमखास दोन नावं घेतली जातात, ती म्हणजे माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे! या दोन्ही बहिणींच्या जोडीने या चित्रपटात वेगळेच रंग भरले होते. आता तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकदा या जोडीची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे या दोघी एका मराठी चित्रपटात एकत्र काम करणार आहेत!

विजय देवसकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर विवेक रंगाचारी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या निमित्ताने माधुरी दीक्षित मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात माधुरी ही प्रमुख भूमिकेत दिसेल. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. मात्र, यावेळी माधुरी आणि रेणुका शाहणे या बहिणींच्या भूमिकेत नसतील.

रेणुका शाहणे यांनी 'मुंबई लाईव्ह'शी केलेली ही खास बातचीत:


भूमिका छोटी पण खास आहे…!

जेव्हा मला तेजसने या भूमिकेविषयी विचरलं, तेव्हा मला माहिती नव्हतं की या चित्रपटात माधुरी प्रमुख भूमिकेत आहे. मी केवळ भूमिका चांगली आहे, म्हणून ती लगेच स्विकारली. या वर्षी माझा मुलगा दहावीत आहे. त्यामुळे मी मोठी भूमिका स्विकारणार नव्हते. पण हा एक छान छोटासा रोल होता, म्हणून मी हो म्हटलं.


माधुरीबरोबर कामं करणं अविस्मरणीय

जेव्हा मला समजलं की या चित्रपटात माधुरी काम करतेय, तेव्हा मला फार आनंद झाला. तब्बल २३ वर्षानंतर आम्ही एकत्र काम करत आहोत. 'हम आपके है कौन'नंतर आम्ही जेव्हा केव्हा भेटलो, तेव्हा कायम 'आपण एकत्र पुन्हा कधी काम करणार?' यावरच बोलायचो. पण कधी संधी मिळाली नाही. आता आम्ही दोघी एकत्र मराठीत काम करत आहोत, याचा आनंद जास्त आहे.


माधुरीबरोबर ब्रेकमध्ये चर्चा

माधुरी आणि माझ्यामध्ये अनेक गोष्टी सारख्या आहेत. त्यामुळे शुटिंगदरम्यान भरपूर गप्पा व्हायच्या. तिची आणि माझी मुले सारख्याच वयाची आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये कायम मुलांवर गप्पा व्हायच्या. शॉट संपल्यासंपल्या लगेच आमच्या गप्पा सुरू व्हायच्या.


माधुरी अतिशय डाऊन टू अर्थ

माधुरी सेटवर येणार म्हटल्यावर युनिटमधल्या सगळ्यांना टेन्शन आलं होतं. सगळ्यांच्याच मनावर एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करणार म्हटल्यावर दडपण होतं. ती प्रत्येक सीनला तेवढ्याच उत्साहाने तयार असते. दिग्दर्शकाची प्रत्येक गोष्ट नीट समजाऊन घेते. त्यामुळे सेटवर माधुरीने अतिशय अपुलकीचं वातावरण तयार केलं होतं.


चित्रपटाबाबत गुपित कायम

अद्याप प्रेक्षकांना चित्रपटात काय बघायला मिळणार आहे? त्याबाबत आम्ही गुपित ठेवणार आहोत. मात्र, मी खात्री देते की हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल!हेही वाचा

पाहा विराट-अनुष्काच्या लग्नाचे काही व्हिडिओ


संबंधित विषय
ताज्या बातम्या