Advertisement

'फिरकी'ची ढील थोडी जास्तच झाली!

शहरात फारसे पतंग उडताना बघायला मिळत नाही. पण गावांमध्ये मात्र तितक्याच उत्साहात पतंगाची काटाकाटी सुरू असते. पतंगबाजीचा हात उत्साह आणि त्यासाठीची कसरत साधा सरळ सोपा विषय मांडलाय 'फिरकी'मध्ये. पण ही 'फिरकी' मांडताना कुठेतरी दिग्दर्शकानं जास्तच ढिल दिलीये असं वाटत राहातं.

'फिरकी'ची ढील थोडी जास्तच झाली!
SHARES

संक्रांत जवळ आली की आपल्याला पूर्वी गल्लीगल्लीत पतंग उडताना दिसायची. काय पो छे...म्हणत पतंगाच्या स्पर्धा रंगायच्या..शहरात फारसे पतंग उडताना बघायला मिळत नाही. पण गावांमध्ये मात्र तितक्याच उत्साहात पतंगाची काटाकाटी सुरू असते. पतंगबाजीचा हात उत्साह आणि त्यासाठीची कसरत साधा सरळ सोपा विषय मांडलाय 'फिरकी'मध्ये. पण ही 'फिरकी' मांडताना कुठेतरी दिग्दर्शकानं जास्तच ढिल दिलीये असं वाटत राहातं.



गोविंद (पार्थ भालेराव), टिचक्या (अथर्व उपासनी) आणि बंड्या (पुष्कर लोणारकर) या तिघांची पतंगाभोवती फिरणारी कथा म्हणजे फिरकी. फिरकीच्या मदतीने जसा पतंग प्रवास करतो, कधी उंच भरारी घेतो तर कधी हेलकावे खातो. आपल्या आयुष्याचे ही तसेच असते. आयुष्यात पुढे जायचे असेल तर प्रत्येक संघर्षावर मात करत पुढे जावे लागते. अगदी असाच संघर्ष या चित्रपटात देखील दाखवला आहे. या तिनही मित्रांना पतंग उडवण्याचा नाद असतो. मात्र, साधा पतंग उडवण्यासाठी त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. मग तो मित्रांशी घेतलेला पंगा असो की पतंगासाठी पैसे गोळा करताना केलेल्या उचापती असोत. गावात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना घेतलेली टशन, केलेली मजा, मस्ती आपल्याला चित्रपटात पहायला मिळते. गावात रंगलेली पतंगाची स्पर्धा, पतंगासाठीचे अनेक संघर्ष, गोविंदच्या बाबांनी त्याला दिलेला कानमंत्र या सगळ्याच गोष्टी एका उत्तम कथानकासाठी पोषक ठरतात.



हा चित्रपट अनेकांना आपल्या बालपणीच्या आठवणीत घेऊन जातो. मात्र, आपल्याला त्या आठवणींत रमतानाही अनेक अडचणी येतात त्या चित्रपटाच्या संकलानामुळे. चित्रपटाची कथा उत्तम असली, तरी ती मांडताना दिग्दर्शक सुनिकेत गांधी आणि संकलक नितेश राठोड कुठेतरी कमी पडले आहेत. उत्कृष्ठ कथा असूनही दिग्दर्शक सुनिकेत गांधी यांनी कथेला योग्य न्याय दिलेला नाही. त्याचप्रामाणे चित्रपटात तगडे कलाकार असतानाही त्यांच्याकडून चांगलं काम काढून घेण्याचं कसब दिग्दर्शकाला जमलेलं नाही.



चित्रपटातील अनेक प्रसंग तुटक वाटतात. तर काही प्रसंग उगाचच लांबले आहेत. काही सेकंद पडदयावर काहीच घडत नसल्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटावरची पकड सैल होते आणि प्रेक्षक कंटाळतो. मध्यांतरापर्यंत चित्रपट फार संथ गतीने पुढे सरकतो. तसेच मध्यांतरांनतरही काही प्रसंग उगाच रेंगाळतात.



गोविंदच्या वडिलांची भूमिका ऋषिकेश जोशी तर आईची भुमिकी अश्विनी गिरी यांनी साकारली आहे. नेहमीप्रमाणेच या दोघांची कामं उत्तम झाली आहेत. मात्र, चित्रपटात त्यांना हवा तसा वाव मिळालेला नाही. पार्थ भालेराव, अथर्व उपासनी, पुष्कर लोणारकर या तिघांनीही आपल्या परीने भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.



चित्रपटातील 'उडते कुठे वेडे मन' हे गाणं जिभेवर रेंगाळत राहतं. या गाण्यातून या तिघांची घट्ट मैत्री आपल्याला बघायला मिळते. मात्र, चित्रपटाची इतर दोन गाणी चित्रपटात नसली असती तरी चालली असती असंच वाटत राहातं.



चित्रपट बघितल्यानंतर लक्षात राहते ती चित्रपटाची कथा, कलाकार आणि चित्रटाच्या शेवटचा पतंग स्पर्धेचा प्रसंग. संक्रांतीच्या सणानंतरही जर तुम्हाला पतंग उडवण्याची मजा घ्यायची असेल, तर एकदा चित्रपटगृहात जाऊन 'फिरकी' बघायला हरकत नाही.




Movie - Firki

Actors - Parth Bhalerao, Atharva Upasani, Pushkar Lonarkar, Hrushikesh Joshi, Ashwini Giri

Rating - 2.5/5


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा