Advertisement

बायको शोधणाऱ्या नवरदेवाची झलक पाहिली का?

'बायको देता का बायको' चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आली आहे. लग्नपत्रिकेद्वारे प्रदर्शित करण्यात आलेली चित्रपटाची पहिली झलक उत्सुकता वाढवणारी आहे. आंतरपाटाआड एका तरुणाचा अर्धा चेहरा पहायला मिळत असून यावर लिहिलेला मजकूरही चित्रपटाची गंमत व त्यातला महत्त्वपूर्ण आशय दर्शवणारा आहे.

बायको शोधणाऱ्या नवरदेवाची झलक पाहिली का?
SHARES

मराठी सिनेसृष्टीच्या पडद्यावर नेहमीच नवनवीन विषयांचे पडसाद उमटत असतात. त्यामुळंच मराठी सिनेमानं आज विश्वभरात आपला दबदबा निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. काही मराठी चित्रपटांची पहिली झलकच इतकी उत्कंठावर्धक असते की बाहेरचं रॅपिंग पाहिल्यावर आत काय दडलंय याची उत्सुकता शिगेला पोहोचते. असाच एक उत्कंठा वाढवणाऱ्या तसंच बायको शोधणाऱ्या नवरदेवाची झलक दाखवणाऱ्या 'बायको देता का बायको' या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला आहे.


बायकोच्या शोधात 

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि जव्हाळ्याचा क्षण. वयात आलेल्या प्रत्येक तरुणाला आपणही लवकर बोहल्यावर चढावं, आपलंही लग्न व्हावं, सुंदर व सुशील बायको मिळावी आणि आपली जोडी चारचौघांत उठून दिसावी अशी इच्छा असते. याच भावनेतून बायकोच्या शोधात निघालेल्या तरुणांची कथा सांगणारा 'बायको देता का बायको' हा धमालपट मराठी रूपेरी पडद्यावर सादर करण्यात येणार आहे.


पहिली झलक

'बायको देता का बायको' चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आली आहे. लग्नपत्रिकेद्वारे प्रदर्शित करण्यात आलेली चित्रपटाची पहिली झलक उत्सुकता वाढवणारी आहे. आंतरपाटाआड एका तरुणाचा अर्धा चेहरा पहायला मिळत असून यावर लिहिलेला मजकूरही चित्रपटाची गंमत व त्यातला महत्त्वपूर्ण आशय दर्शवणारा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेश साहेबराव ठाणगे यांनी केलं असून, निर्मिती धनंजय रामदास यमपुरे यांची आहे.


नावं गुलदस्त्यात

ऐन लग्नसराईच्या मोसमात धमाल उडवून देण्यासाठी 'बायको देता का बायको' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील बऱ्याच गोष्टी सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये दिसणारा चेहरा कोणत्या कलाकाराचा आहे हेदेखील उघड करण्यात आलं नाही. याखेरीज इतर कलाकार-तंत्रज्ञांची नावंही गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच यावरूनही पडदा उठवण्यात येईल.



हेही वाचा -

खलनायकी भूमिकेत सुप्रित निकम

१४ वर्षांनी नीना कुळकर्णी पुन्हा बनल्या स्वप्नीलची आई




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा