Advertisement

सरकारी योजनांचा बोलबाला

प्रथमच दिग्दर्शन करताना दिग्दर्शक रामकुमार शेडगेने एक अशी कथा निवडली, जी यापूर्वी कुठे ना कुठे पाहिलेली आहे. सरकारी योजना आणि हिंदीतील बड्या सेलिब्रिटीजचा तडका देत यशाचा मार्ग शोधण्याचा रामकुमारने केलेला प्रयत्न थिटा पडला आहे.

सरकारी योजनांचा बोलबाला
SHARES

समाज प्रबोधनाचा झेंडा फडकवत सरकार दरबारी राबवल्या जाणाऱ्या सर्वच योजनांचा सिनेमात कशा प्रकारे समावेश करता येईल याची आखणी करून हा सिनेमा बनवलेला आहे. प्रथमच दिग्दर्शन करताना दिग्दर्शक रामकुमार शेडगेने एक अशी कथा निवडली, जी यापूर्वी कुठे ना कुठे पाहिलेली आहे. सरकारी योजना आणि हिंदीतील बड्या सेलिब्रिटीजचा तडका देत यशाचा मार्ग शोधण्याचा रामकुमारने केलेला प्रयत्न थिटा पडला आहे.

जन्मत:च मृत्यू पावलेली आई... तिच्या पश्चात वडीलांचीही साथ सुटल्याने अनाथ झालेली मुलं... तत्पश्चात त्यांनी केलेला संघर्ष… असं काहीसं ओळखीचं कथानक या सिनेमात आहे. जनीचा (मैथिली पटवर्धन) जन्म होतो आणि तिची आई देवाघरी जाते. त्यामुळे गावकरी पांढऱ्या पायाची ठरवून तिला दोष देतात, पण तिचे वडील (कमलेश सावंत) त्यांना जुमानत नाहीत. त्यांचंही अपघातात निधन होतं.

त्यानंतर जनीचा थोरला भाऊ हरी (साहिल जोशी) तिची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. तिला शिकवून मोठं करण्याचा निश्चय करतो. गावकऱ्यांनी हाकलून दिलेल्या हरी-जनीची भेट आज्याशी (किशोर कदम) होते. आज्या दोघांनाही मदत करतो, पण त्यांची सोबतही फार काळ राहात नाही. त्यानंतर हरी आपल्या बहिणीला शिकवण्यासाठी कशाप्रकारे मेहनत घेतो त्याचं चित्रीण या सिनेमात आहे.



सिनेमाचा विषय यापूर्वी आलेला असल्याने नावीन्याचा अभाव जाणवतो. पटकथेची मांडणीही तितकीशी प्रभावी नसल्याने कलाकारांचा अभिनयही या सिनेमाला तारू शकणारा नाही. संवाद ठीकठाक असल्याने काही इमोशनल सीन्स चांगले जमले आहेत. मुलगी वाढवा, मुलगी शिकवा... मुलगी शिकली, प्रगती झाली... मुलींना शाळेत जाऊ द्या... निराधारांना आधार द्या... मुलींची बँकेत खाती उघडा... पंतप्रधानांची ‘मन की बात’... चित्रकला-हस्तकलेला प्रोत्साहन द्या... कागदी पिशव्यांचा वापर करा... या आणि यांसारख्या बऱ्याच योजना टप्प्याटप्प्याने सिनेमात येतात. सरकारी योजनांचा समावेश करणं चूक नसलं तरी त्या कथेच्या ओघाने आल्या असत्या तर सिनेमा पाहताना ते खटकलं नसतं.



निराधारांना आधार द्या हे श्रीमंतांना सांगण्यासाठी तमन्नाची एंट्री होते, पण तो संपूर्ण सीनच इतका फिका पडलाय की त्या ठिकाणी अन्य एखादी सर्वसामान्य अभिनेत्री असती तरी फारसा फरक पडला नसता. बाप्पाच्या रूपात सुनील शेट्टीच्या एंट्रीसाठी घडवलेला किडनॅपिंगचा ड्रामा अतिशयोक्ती वाटते. शाळेतील वॅाचमनच्या डोळ्यात तरळणारे अश्रू आणि त्याने केलेली कॅामेडी दोन्ही तकलादू वाटतात.



आज्या कधी कर्नाटकी हेल असलेल्या भाषेत, तर कधी वेगळ्याच टोनमध्ये बोलतो. काव्यामध्ये तर आज्या शुद्ध मराठी बोलतो. त्यामुळे कशाचाच कशाला ताळमेळ नाही. कॅमेरावर्क, संकलन, वेशभूषा, सादरीकरण या सर्वच बाबतीत हा सिनेमा सामान्य दर्जाचा आहे. थोडक्यात काय तर सरकारला खूश करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं जाणवतं. अमृता फडणवीस यांची सिनेमा संपल्यावर येणारं गाणंही त्याचीच प्रचिती देणारं आहे.



कलाकारांनी आपल्या परीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य बालकलाकाराच्या भूमिकेतील साहिल जोशी आणि मैथिली पटवर्धन यांनी हृदयस्पर्शी अभिनय केला आहे. किशोर कदम यांनी साकारलेला आज्याही स्मरणात राहतो. याशिवाय सतिश पुळेकरांनी साकारलेले मुख्याध्यापक, विजय पाटकर यांनी साकारलेला शिपाई चांगले झाले आहेत. सुनील शेट्टीची दमदार एंट्री आणि मराठी संवाद आहेत. या तुलनेत तमन्नावर चित्रीत करण्यात आलेला सीन खूपच सामान्य वाटतो. सनी पवार, आर्या घारे, कमलेश सावंत या सर्वांनी छोट्याशा भूमिकाही चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत.

या सिनेमात वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी तो कुठेही वास्तववादी न वाटता ड्रामा वाटतो. त्यामुळे केवळ सरकारी योजनांचा बोलबाला करण्यासाठीच हा सिनेमा बनवला आहे की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

दर्जा : **


सिनेमा : अ.ब.क.

निर्माता : मिहीर कुलकर्णी

दिग्दर्शक : रामकुमार शेडगे

कलाकार : साहिल जोशी, मैथिली पटवर्धन, सनी पवार, विजय पाटकर, सतीश पुळेकर, कमलेश सावंत, प्रेमा किरण, किशोर कदम, सविता मालपेकर, सुनील शेट्टी, तमन्ना



हेही वाचा-

सीमारेषेच्या पलिकडे न गेलेला षटकार

शिलेदाराच्या असामान्य शौर्याची कथा ‘फर्जंद’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा