Advertisement

सायकल...एकदा रपेट मारायलाच हवी!

तुम्हाला तुमची पहिली सायकल आठवतेय का? नक्कीच आठवत असणार! कारण सायकलची प्रत्येकाच्या आयुष्यात एक हळवी जागा असते. सायकल म्हटलं की अनेक जुन्या आठवणी समोर येतात. अशाच आठवणींच्या भाबड्या जगात सफर घडवून आणणारा सायकल हा सिनेमा बघितल्यावर तुम्ही नक्कीच नॉस्टॅल्जिक व्हाल!

सायकल...एकदा रपेट मारायलाच हवी!
SHARES

तुम्हाला तुमची पहिली सायकल आठवतेय का? नक्कीच आठवत असणार! कारण सायकलची प्रत्येकाच्या आयुष्यात एक हळवी जागा असते. सायकल म्हटलं की अनेक जुन्या आठवणी समोर येतात. अशाच आठवणींच्या भाबड्या जगात सफर घडवून आणणारा सायकल हा सिनेमा बघितल्यावर तुम्ही नक्कीच नॉस्टॅल्जिक व्हाल!



१९५२ चा हा काळ. केशव (ऋषिकेश जोशी) या ज्योतिषाचं आपल्या सायकलवर असलेलं प्रेम चित्रपटाच्या पहिल्या वाक्यापासूनच आपल्या लक्षात येतं. केशव आपल्या मुलीला म्हणजेच मृण्मयीला (मैथिली पटवर्धन) शाळेतून घरी आणताना या आधी १०० वेळा सांगितलेली सायकल बद्दलची गोष्ट सांगतो. त्यावरून केशवला ही सायकल किती प्रिय आहे हे लक्षात येतं. केशवच्या आजोबांना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने ही सायकली बक्षीस म्हणून दिलेली असते. आजोबांइतकीच केशवही आपल्या लाडक्या सायकलची काळजी घेत असतो. जीवापाड जपत असतो. केशवची सायकल हळूहळू त्याची आयडेंटिटी होते. केशव इतकीच त्याची सायकलही पंचक्रोषीत प्रसिद्ध असते.



मदत करण्याच्या स्वभावामुळे केशव सगळ्यांच्या लाडका असतोच. गावात एक दिवस चोर येतात (भाऊ कदम) (प्रियदर्शन जाधव), आणि ते केशवची सायकल चोरतात. आपली सायकल चोरीला गेल्यामुळे केशव फार खचून जातो आणि सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. तर दुसरीकडे त्या सायकलमुळे चोर उघडे पडतात. केवळ केशवच्या गावातीलच नाही, तर आजूबाजूच्या गावातील प्रत्येक जण, ही ‘केशवची सायकल ना? मग तुमच्याकडे कशी?' असं म्हणतं प्रत्येक जण विचारपूस करतात. मात्र, चोर केशवचे आत्येभाऊ असल्याची थाप सगळ्यांना पटते आणि त्या चोरांचं प्रत्येक ठिकाणी स्वागत होतं. त्यानंतर केशवचा सुरू झालेला सायकल शोध आणि चोरांचा होणारा सामना अशा कथानकावर हा चित्रपट बेतलेला आहे.



या चित्रपटातून सायकलमधून एक संदेश खूप हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. ही एक सरळ साधी कथा आहे. आपलं सायकलवर असणारं प्रेम, सायकल शोधतानाच्या प्रवासात केशवला आलेले अनुभव अगदी सोप्या पद्धतीने मांडले आहेत. गावातील लोकांच्या हातातील 'केसरी' चित्रपटाचा काळ सतत दर्शवतो. आपल्या एखाद्या प्रिय वस्तूमध्ये आपण किती अडकत जातो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सायकल. सायकल बघताना आपसूकच आपण त्या सायकलवरून चक्कर मारून येतो. मात्र मध्यंतरानंतर चक्कर माराताना थोडा मोठा वळसा पडल्यासारखं वाटतं.



'कॉफी आणि बरंच काही', 'अॅण्ड जरा हटके' आणि 'हंपी'सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी केशवच्या जगातलं भाबडं भावविश्व अगदी अचूक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे. कोकणाचे, स्वातंत्र्यपूर्व काळाचे दर्शन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे श्रेय प्रकाश कुंटे यांनाच जाते.

केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे. तसेच, चोराच्या भूमिकेत असणारे प्रियदर्शन जाधव आणि भाऊ कदम यांनी आपल्या भूमिका चोख पार पडल्या आहेत. भाऊ कदम यांना बघताना पुन्हा भाऊ दिसत असला, तरी त्याचा कंटाळा येत नाही. भाऊचं बोलणं चित्रपट बघताना प्रेक्षकांना हसायला भाग पडतं. केशवच्या बायकोच्या भूमिकेत असलेली दिप्ती लेले ही भाव खाऊन जाते. त्याचबरोबर मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय चित्रपटानंतरही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो.

त्यामुळे या उन्हाळाच्या सुट्टीत पुन्हा लहानपण जगायचं असेल, जुन्या आठवणींत रमायचं असेल, तर या सायकलवरून एकदा चक्कर मारायला काहीच हरकत नाही!



Movie - Cycle

Actors - Rhushikesh Joshi, Maithili Patwardhan, Dipti Lele, Priyadarshan Jadhav, Bhalchandra Kadam

Ratings - 3/5


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा