Advertisement

आवाक्याबाहेर गेलेला अगड'बम’!

या चित्रपटातील कलाकारांचं कौतुक करावं लागेल. शीर्षक भूमिकेत तृप्तीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. प्रोस्थेटिक्स मेकअप केल्यानंतही कॅमेऱ्यासमोर तिचं सहजपणे वावरणं कातुकास्पद आहे. या चित्रपटात सुबोध भावे एका वेगळ्याच रूपात दिसतो.

आवाक्याबाहेर गेलेला अगड'बम’!
SHARES

जवळपास ८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अगडबम’ या चित्रपटाचा पुढील भाग ‘माझा अगडबम’च्या रूपात प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागातील २५० किलो वजनाची नाजुका दुसऱ्या भागात ३५० किलोंची झाली आहे. त्यासोबतच नाजुकाची भूमिका साकारणारी तृप्ती भोईर या चित्रपटाची लेखिका आणि दिग्दर्शका बनली आहे. रायबा आणि नाजुका या दोन व्यक्तिरेखांभोवती तृप्तीने कथेचा डोलारा उभारला असला असून, त्याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे.


ओळखीच्या फॅार्म्युल्यांचा समावेश

एका लठ्ठ तरुणीची कथा सादर करताना तृप्तीने 'डब्ल्यूडब्ल्यूएफ' या केवळ दिखाव्याच्या कुस्तीचा तडका देत एक असं कथानक लिहिलं आहे जे कल्पनेपलीकडलं आहे. त्यात तिने यापूर्वी बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये पाहिलेल्या काही ओळखीच्या फॅार्म्युल्यांचाही समावेश केला आहे. लठ्ठ नाजुकाला विविध गेटअप्समध्ये सादर करून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्नही तृप्तीने केला आहे. प्रोस्थेटिक्स मेकअपच्या साहाय्याने लठ्ठ नाजूका साकारण्याचं काम मात्र तृप्तीने यशस्वीपणे केलं आहे.


काय आहे कथा?

आबासाहेब पैलवान (जयवंत वाडकर) यांची लठ्ठ कन्या नाजुकाचा (तृ्प्ती भोईर) विवाह रायबाशी (सुबोध भावे) होतो. लठ्ठ असूनही मनापासून प्रेम करणारा नवरा आणि सुनेला समजून घेणारी सासू (उषा नाडकर्णी) मिळाल्याने नाजुका सुखाने संसार करत असते. इकडे तिचे बाबा कुस्तीच्या आखाड्यात पैलवान तयार करण्यात व्यग्र असतात. एकदा विदेशी पैलवानांच्या कुस्त्यांच्या सामन्यांसाठी आबासाहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात.

तिथे विजेत्या पैलवानाला नकळतपणे काहीबाही बोलतात. ते ऐकून तो पैलवान आबासाहेबांना आव्हान देतो. आबा त्याचं आव्हान स्वीकारतात आणि हरतात. तो पैलवान मग संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान देतो. त्यामुळे आबासाहेबांना लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. आपला मुलगा असता तर तो कुस्तीच्या रिंगणात उतरला असता ही खंत त्यांच्या मनात असते. वडिलांची चिंता पाहून नाजुका स्वत: च माझा पैलवान बनून विदेशी पैलवानासमोर उभी ठाकते. त्यानंतर काय घडतं ते या चित्रपटात आहे.


जुनेच प्रसंग

या चित्रपटात जशा काही चांगल्या गोष्टी आहेत, तशा काही वाईटही आहेत. चित्रपटाचं लेखन करताना नावीन्यपूर्ण घटनांचा समावेश करण्याची गरज होती. याउलट पूर्वी पाहिलेल्या चित्रपटांमधील घटनांचा समावेश केल्याने निराशा होते. दिग्दर्शिका म्हणून जरी तृप्तीचा हा पहिलाच प्रयत्न असला, तरी तिला अजून बऱ्याच गोष्टी शिकण्याची गरज आहे.


उत्तम तंत्रज्ञान

चित्रपटाचं पार्श्वसंगीत श्रवणीय आहे. दक्षिणात्य शैलीतील संगीत संपूर्ण चित्रपटात सुखद धक्का देतं. या जोडीला कॅमेरावर्क आणि संकलन ही कामंही झकास झाली आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट एखाद्या दक्षिणात्य किंवा हिंदी चित्रपटाशी तुलना करणारा आहे. या जोडीला प्रोस्थेटिक मेकअपचं कामही अफलातून झालं आहे.


पटकथेत उणीवा

एखादी लठ्ठ स्त्री बाथरुमच्या छोट्याशा खिडकीतून दररोज बाहेर जाते, भर दिवसा पाईपावरून खाली उतरते आणि पुन्हा त्याच वाटेने परत घरी येते हे जरा अतीच वाटतं. त्यात भिंतींना भेगा पडणं, पाईप तुटणं, ती खाली पडून भला मोठा खड्डा पडणं या गोष्टी होऊनही तिचा दिनक्रम सुरूच असतो. मराठी बोलणाऱ्या सुमो पैलवानाकडून नाजूकानं कुस्तीचं प्रशिक्षण घेणंही हास्यास्पद वाटतं. सुमो पैलवानांची कुस्ती आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ कुस्ती यांच्यात खूप फरक आहे. एकूणच पटकथेत आणि सादरीकरणात बऱ्याच उणीवा राहिल्याने हा चित्रपट काहीसा बालीश वाटतो.


तृप्तीचा सहज वावर

या चित्रपटातील कलाकारांचं कौतुक करावं लागेल. शीर्षक भूमिकेत तृप्तीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. प्रोस्थेटिक्स मेकअप केल्यानंतही कॅमेऱ्यासमोर तिचं सहजपणे वावरणं कातुकास्पद आहे. या चित्रपटात सुबोध भावे एका वेगळ्याच रूपात दिसतो. कायम संतापलेला आणि नेहमीच्या शैलीत न बोलणारा सुबोध यात आहे.


उषा नाडकर्णींनी रंगवलेली सासू खाष्ट नसून मायाळू आहे. तानाजी गालगुंडे आणि सुबोधचा मुलगा कान्हा भावे यांनी नाजूकाला उत्तम साथ देत चांगलं काम केलं आहे. जयवंत वाडकर यांनी नाजूकाच्या वडिलांची भूमिका अचूकपणे साकारली असली, तरी ते पैलवान म्हणून शोभत नाहीत. खरेखुरे विदेशी पैलवान लक्ष वेधून घेण्याचं काम करतात.

कलाकारांचा अभिनय आणि तांत्रिक बाबी या चित्रपटाला तारक असल्या तरी पटकथा काहीशी मारक आहे. त्यामुळे नावाप्रमाणे अगडबम मनोरंजन करण्यात तितकासा यशस्वी न ठरलेला हा चित्रपट पाहायचा की नाही ते प्रत्येकानेच ठरवलेलं बरं.

दर्जा : **

...................................

चित्रपट: माझा अगडबम

निर्माता: तृप्ती भोईर, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा

पटकथा: तृप्ती भोईर, शेख दाऊद जि.

दिग्दर्शन: तृप्ती भोईर

कलाकार: तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, कान्हा भावे, तानाजी गालगुंडे, डॉ. विलास उजवणे



हेही वाचा-

पहा कोजागिरीच्या रात्री ‘सिम्बा’च्या सेटवर काय घडलं?

#Metoo: विकास बहल आणखी गोत्यात; लैंगिक अत्याचार केल्याचं महिलेचं प्रतिज्ञापत्र



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा