Advertisement

न पेटलेलं युद्ध...रणांगण!

एज्युकेशन मिनिस्टर शामराव देशमुख (सचिन पिळगांवकर) आणि त्यांचा मानस पुत्र श्लोक(स्वप्निल जोशी) यांच्यातल्या युद्धाची कथा म्हणजे रणांगण. आपल्या घराण्याला वारस मिळावा यासाठी रचलेलं कारस्थान, घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी खेळलेले डावपेच आणि त्यासाठी शामरावांनी केलेला श्लोकचा वापर या दोघांमध्ये युद्ध पेटण्यासाठी कारण ठरतं आणि युद्धात अनेक जुने धागेदोरे समोर येतात.

न पेटलेलं युद्ध...रणांगण!
SHARES

'आता युद्ध अटळ आहे'..असं म्हणत 'रणांगण'चं रणशिंग फुंकलं खरं, पण हे युद्ध बघताना मात्र रटाळ वाटलं. दोन्ही बाजू तेवढ्याच ताकदीच्या आहेत..दोन्ही बाजूला तेवढेच सक्षम दावेदारही आहेत..पण तरी रणांगण पेटल्यासारखं शेवटपर्यंत वाटत नाही. त्यामुळे खूप आशेने रणांगण बघायला गेल्यावर पदरी मात्र निराशाच येते.




एज्युकेशन मिनिस्टर शामराव देशमुख (सचिन पिळगांवकर) आणि त्यांचा मानस पुत्र श्लोक(स्वप्निल जोशी) यांच्यातल्या युद्धाची कथा म्हणजे रणांगण. आपल्या घराण्याला वारस मिळावा यासाठी रचलेलं कारस्थान, घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी खेळलेले डावपेच आणि त्यासाठी शामरावांनी केलेला श्लोकचा वापर या दोघांमध्ये युद्ध पेटण्यासाठी कारण ठरतं आणि युद्धात अनेक जुने धागेदोरे समोर येतात.



घराण्याला वारस मिळावा यासाठी शामराव देशमुख एका आधीपासूनच गरोदर असणाऱ्या मुलीला सानिकाला (प्रणाली घोगरे) घरी सून म्हणून आणतो. कारण शामरावांचा मुलगा वरद (सिद्धार्थ चांदेकर)हा कधीच बाप बनू शकणार नसतो. सानिका घरी आल्यामुळे मात्र श्लोकला त्रास होतो. सानिकाही श्लोकला त्या घरात बघून हादरते. सतत श्लोक आजूबाजूला असण्याचा सानिकाला त्रास होतो. आणि एक दिवस श्लोकला आपल्या जन्माचं सत्य समजतं. आणि त्याक्षणी श्लोक आणि शामराव यांच्यामध्ये युद्धाची ठिणगी पडते.




चित्रपटाची सुरूवात 'सख्या रे घायाळ मी हरिणी' या गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या गाण्याने होते. या गाण्यात प्रार्थना बेहरेे दिसते. त्यानंतर प्रार्थनाला श्लोक मंदिराच्या कड्यावरून ढकलून देतो आणि तेव्हा तो सगळ्यांसमोर एक खलनायक म्हणून येतो. मात्र, संपूर्ण चित्रपटात पुन्हा कधीच श्लोक खलनायक वाटत नाही. आपल्या आईच्या खूनाचा बदला घेणारा मुलगा म्हणूनच श्लोक प्रेक्षकांसमोर येतो. चित्रपटाची कथा चांगली असली, तरी चित्रपटातील डायलॉगमधील तोचतोचपणा नंतर नकोसा होतो. श्लोकच्या तोंडी सतत 'बालभारती धडा ५, धडा ६' आणि त्यापुढे एखाद्या वाक्प्रचाराच्या सततच्या वापरामुळे प्रेक्षक कंटाळतो.




त्याचप्रमाणे चित्रपटात असलेला गाण्यांचा भरणाही नकोसा होतो. चित्रपटातील अनेक गाण्यांमधलं केवळ 'सख्या रे, घायाळ मी हरिणी' हेच गाणं चित्रपट संपल्यानंतरही लक्षात राहतं. प्राजक्ता माळी हिच्यावर चित्रित झालेलं गणपतीचं गाणं असो किंवा वैभव तत्त्ववादी आणि संतोष जुवेकर यांच्यावर चित्रीत झालेलं 'नाद करायचा नाय' हे गाणं चित्रपटात उगाच असल्यासारखं वाटतं. त्याचप्रमाणे चित्रपटात अनेक सीनमध्ये संगीत लाऊड झाल्यासारखं वाटतं. स्वप्निलने सतत वाजवलेली बासरी नंतर कानाला नकोशी व्हायला लागते.




अभिनयाच्या बाबतीत मात्र सगळ्यांनीच चोख कामगिरी बजावली आहे. स्वप्निल जोशी आणि सचिन पिळगांवकर यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. सानिकाच्या भुमिकेत असणारी प्रणाली घोगरे हिचा हा पहिलाच चित्रपट असला तरी तुम्हाला चित्रपट बघताना ते एकदाही जाणवत नाही. दिग्दर्शक राकेश सारंग यांचं उत्तम दिग्दर्शन चित्रपटाला लाभलं आहे. मात्र, अनेकवेळा बॉलिवूडचा चित्रपट बघितल्याचा भास होतो. प्रार्थना बेहेरेची चित्रपटाच्या सुरूवातीची दृश्य संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांची आठवण करून देते.




नावावरून चित्रपटात विशेष काहीतरी बघायला मिळण्याच्या अपेक्षा वाढतात. पण तुम्हाला अपेक्षित असलेलं युद्ध तुम्हाला बघायला मिळतच नाही. मात्र, तुम्ही स्वप्निल जोशीचे फॅन असाल आणि तुम्हाला स्वप्निलचा वेगळा अंदाज बघायचा असेल, तर आणि तरच रणांगण चित्रपटगृहात जाऊन बघा. नाहीतर युद्ध नसलेल्या रणांगणावर न गेलेलंच बरं!


Movie - Ranangan

Actors - Sachin Pilgaonkar, Swapnil Joshi, Siddharth Chandekar, Pranali Ghogre

Ratings - 2.5/5


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा