Advertisement

Movie Review: आश्चर्याचे धक्के देणारी 'गर्लफ्रेंड'

या चित्रपटात दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी अशाच एका तरुणाची कथा रेखाटली आहे. सई ताम्हणकरसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीच्या ग्लॅमरची जोड देत त्यांनी काहीशी आश्चर्याचे धक्के देणारी 'गर्लफ्रेंड' सादर केली आहे.

SHARES

आजच्या काळात एखाद्या तरुणाला गर्लफ्रेंड नसली तर घरापासून आफिसपर्यंत त्याच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. त्या मुलालाही मग आपल्याला गर्लफ्रेंड नसल्याची खंत वाटू लागते. या चित्रपटातही दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी अशाच एका तरुणाची कथा रेखाटली आहे. सई ताम्हणकरसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीच्या ग्लॅमरची जोड देत त्यांनी काहीशी आश्चर्याचे धक्के देणारी 'गर्लफ्रेंड' सादर केली आहे.

सर्व वयोगटासाठी

चित्रपटातील वातावरण आजच्या काळातील आहे. मग ते नायकाच्या कुटुंबातील असो, वा आफिसमधील... फ्रेंड सर्कलमधील असो, वा नातेवाईकांमधील... त्यामुळं 'गर्लफ्रेंड'ची ही स्टोरी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करणारी आहे. गीत-संगीत आणि नावीन्यपूर्ण पार्श्वसंगीताची जोड देत ती अधिक खुलवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. लेखन पातळीवरही दिग्दर्शकानं मेहनत घेतल्यानं चित्रपट पाहताना हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे की यापूर्वीही दिग्दर्शन केलंय असा विचार मनात येऊन जातोच.


'अशी' आहे स्टोरी

ही कथा आहे ग्राफिक्स डिझायनर असलेल्या नचिकेत प्रधानची (अमेय वाघ). चित्रपटाची सुरुवात नचिकेतच्या वाढदिवसापासून होते. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वाढदिवस असूनही गर्लफ्रेंड नसल्यानं आई-वडीलांपासून (कविता लाड-यतीन कार्येकर) लहान भावापर्यंत (तेजस बर्वे) आणि मित्रमंडळींपासून आफिसमधील सहकारी आणि बाॅसपर्यंत (सागर देशमुख) सर्वच जण त्याला हिणवत असतात. गर्लफ्रेंड नसल्यानं नचिकेतला रिलेशनशीप जमत नसल्याचं सांगून बाॅस त्याला प्रमोशन नाकारतो. याच फ्रस्ट्रेशनमध्ये रात्री ड्रिंक करून नचिकेत स्वत: शीच वाद घालतो. सकाळी उठतो, तर रिलेशनशीपमध्ये असल्याचं चक्क त्यानं फेसबुकवर जाहीर केलेलं असतं. आलिशा नेरुरकर (सई ताम्हणकर) नावाची गर्लफ्रेंड नचिकेतच्या जीवनात कशी येते आणि पुढं काय घडतं त्याची कथा या चित्रपटात आहे.

मांडणी वेगळी

चित्रपटाची वनलाईन सुरेख आहे. आजवर प्रेम आणि गर्लफ्रेंड हा विषय बऱ्याचदा चित्रपटांच्या माध्यमातून समोर आला असला तरी पटकथेची मांडणीही काहीशी वेगळ्या प्रकारे केल्यानं ही गर्लफ्रेंड खिळवून ठेवते. संवाद केवळ आजच्या तरूणाईला नजरेसमोर ठेवून लिहिण्यात आलेले नसून, आजच्या काळातील पालकांनाही लक्षात घेतलं आहे. त्यामुळंच नायकाची आई चक्क आपल्या मुलाला 'तुला मुलं आवडतात का?' असं बिनधास्तपणे विचारते. वडील आणि थोरला भाऊही 'आता त्याचे शेकहँड करण्याचे दिवस संपले', असं मस्तीत म्हणताना दिसतात. आजच्या काळात गर्लफ्रेंडला पर्याय नाही हे सत्य चित्रपटाच्या सुरुवातीला सर्वांनीच ठासून सांगितलेलं थोडं अती वाटतं. कम्प्युटर आणि सोशल मीडियाचा सुरेख वापर आणि सादरीकरण करण्यात आलं आहे.


गर्लफ्रेंडची एंट्री

खरं तर नचिकेतच्या आयुष्यात त्याच्या गर्लफ्रेंडची एंट्री एका आयडीयानं होते. त्यामुळं 'आयडीया केली आणि अंगाशी आली', असं काहीसं होईल असं वाटतं; परंतु तसं काही होत नाही. नायिकेची धक्कादायक एंट्री होते आणि नंतर ती आश्चर्याचे धक्के देतच राहते. पटकथेतील हेच ट्वीस्ट अँड टर्न्स अनपेक्षित धक्के देत खिळवून ठेवण्याचं काम करतात. चित्रपट सुरू झाल्यापासून आवश्यक गती राखण्यात यशस्वी ठरतो, पण मध्यंतरानंतर थोडासा संथ होतो. त्यामुळं कंटाळा येतो, पण थोड्या वेळातच पुन्हा ट्रॅकवर येतो. नायिकेचं काहीसं विक्षिप्त वागणं, अचानक एखाद्याला रोखून पाहणं, पर्समधील काचेच्या बाटलीमध्ये काहीतरी भरणं या सर्व गोष्टींचा अखेरीस खुलासा होईल असं वाटतं, पण होत नाही.

गाणी श्रवणीय

साध्या सोप्या वाटणाऱ्या दृश्यांमधून दिग्दर्शकांनी त्याला काय दाखवायचं आहे ते सादर केलं आहे. चित्रपटातील गाणी कथेत अचूक जागी बसलेली आहेत. 'लव्हस्टोरी...' हे नायक-नायिकेची लव्हस्टोरी सांगणारं गाणं छान झालं असून, उत्तमरीत्या सादर करण्यात आलं आहे. 'नच्या गाट अ गर्लफ्रेंड...' हे गाणंही श्रवणीय असून, ताल धरायला लावणारं आहे. 'केरींदा केरींदो...' हे स्पॅनिश आणि मराठी मिक्स असलेलं आणि 'कोडे सोपे थोडे...' हे हळूवार गाणं चांगलं आहे. या चित्रपटाचं पार्श्वसंगीत प्रेमकथेसाठी थोडं खटकणारं वाटत असलं तरी फ्रेश आहे. कॅमेरावर्क आणि इतर तांत्रिक बाबीसुद्धा चांगल्या आहेत. थोडक्यात काय तर दिग्दर्शकाच्या रूपातील उपेंद्र सिधये यांचा पहिला प्रयत्न चांगला झाला आहे.


अमेयचं वेगळं रूप

अमेय वाघचं एक वेगळंच रूप या चित्रपटात पहायला मिळतं. या व्यक्तिरेखेसाठी त्यानं केलेला गेटअप आणि वाढवलेलं वजन हे पडद्यावर त्याला पाहताच जाणवतं, पण त्याहीपेक्षा नचिकेत साकारण्यासाठी त्यानं घेतलेली मेहनतही पहायला मिळते, पण सुरुवातीला काहीसा बावळटपणा आणण्याचा त्यानं केलेला प्रयत्न तितकासा यशस्वी वाटत नाही. सई ताम्हणकरच्या ग्लॅमरचा जलवा यात आहे. सईनं साकारलेली आलिशा-पायल लक्षात राहण्याजोगी असली तरी अमेयसोबत तिची जोडी थोडी मिसमॅच वाटते. रसिका सुनीलची भूमिका तशी फार मोठी नाही, पण सुरुवातीच्याच एका सीनमध्ये तिनं केलेला काहीसा मादक सीन छान झाला आहे. ईशा केसकरनं खुसपटं काढणाऱ्या मित्राची पत्नी साकारली आहे. यतिन कार्येकर, कविता लाड, सागर देशमुख, सागर देशमुख, सुयोग गोऱ्हे, उदय नेने, तेजस बर्वे यांची कामंही चांगली झाली आहेत.

या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकानं आजच्या पिढीतील तरुणाची कहाणी मांडली आहे. त्यामुळं गर्लफ्रेंड नसल्यानं दु:खी असलेल्यांनाही हा सिनेमा आवडेल आणि गर्लफ्रेंड असलेल्यांनाही. आक्षेपार्ह असं काही नसल्यानं एकदा तरी हा चित्रपट पहायला हरकत नाही.


दर्जा : ***१/२ 

निर्माते – अनिश जोग, रणजीत गुगळे

लेखक, दिग्दर्शक – उपेंद्र सिधये

कलाकार : अमेय वाघ, सई ताम्हणकर, ईशा केसकर, रसिका सुनील, यतिन कार्येकर, कविता लाड, सागर देशमुख, सुयोग गोऱ्हे, उदय नेने, तेजस बर्वे, सागर देशमुख



हेही वाचा-

'टकाटक'ची सक्सेस पार्टी! नक्की बघा, कोण काय म्हणालं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा