Advertisement

Movie Review: मूक-बधीर 'बाबा'ची हृदयस्पर्शी कथा

पहिलाच चित्रपट असूनही राज गुप्ता या नवोदित दिग्दर्शकानं नि:शब्द भावनांचा अर्थपूर्ण खेळ मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

SHARES

संजय आणि मान्यता दत्त यांना मराठी चित्रपटसृष्टीकडं वळण्यासाठी प्रोत्साहित केलेल्या या चित्रपटात असं काय विशेष आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता आणि 'तनु वेड्स मनू' या चित्रपटामध्ये आर. माधवनच्या मित्राच्या भूमिकेत लक्ष वेधून घेणाऱ्या दीपक डोब्रियालची मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री ही या चित्रपटाची खासियत. दीपकचा अभिनय पाहण्याचंही कुतूहलही हा चित्रपट लाइमलाईटमध्ये येण्यामागील कारण आहे. पहिलाच चित्रपट असूनही राज गुप्ता या नवोदित दिग्दर्शकानं नि:शब्द भावनांचा अर्थपूर्ण खेळ मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

'बाबा'ची कथा माधव-आनंदी (दीपक डोब्रीयाल-नंदिता पाटकर) हे मूक-बधीर दाम्पत्य आणि त्यांच्या बोलता न येणाऱ्या शंकर (आर्यन मेंघजी) या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असूनही दोघेही शंकरला मोठ्या हौसेनं वाढवतात. जन्मापासून आठ वर्षांचा होईपर्यंत त्याची सर्व हौस-मौज भागवतात. हत्यारांना धार काढण्याचं काम करत उदरनिर्वाह करणारा माधव आपल्या मुलाला हवं ते देण्यासाठी जीवाचं रान करत असतो. जन्मापासून मूक-बधीर आई-वडीलांसोबतच राहिल्यानं शंकरलाही बोलता येत नसतं. एकदा माधवसोबत जत्रेला गेल्यावर शंकरला बाहेरच्या जगात बरेच आवाज असल्याचं ज्ञान होतं. अशातच एक दिवस अचानक पुण्याहून एक दाम्पत्य (स्पृहा जोशी-अभिजीत खांडकेरकर) येतं आणि शंकर आपला मुलगा असल्याचा दावा करतं. माधव आणि आनंदी या संकटाचा सामना कशाप्रकारे करतं त्याची कथा म्हणजेच 'बाबा'.

जन्मत:च मूक-बधीर नसूनही तशा वातावरणात राहिल्यानं मुलावरही तोच परिणाम होणं ही वनलाईन सुरेख आहे. संजय दत्तचं प्रोडक्शन, दीपक डोब्रीयालची मराठीत एंट्री आणि उत्कंठावर्धक ट्रेलरमुळं चित्रपटाकडून अपेक्षा वाढतात. मनिष सिंग यांनी एका चांगल्या वनलाईनवर तितकीच चांगली पटकथाही लिहीली आहे. त्यामुळंच चित्रपट सुरू झाल्यानंतर सुरुवातीला आपण काहीतरी वेगळं पहात आहोत याची जाणीवही होते. थोड्या वेळानं मात्र तोच तोचपणा आल्यासारखा वाटतो. कथा ज्या वेगात पुढे जायला हवी त्याची उणीव भासते. मुलावर दावा करणाऱ्या दाम्पत्याची एंट्री झाल्यावर मात्र कथेत एक नवं वळण येतं. आजवर नेहमीच शहरी कोर्ट दाखवणाऱ्या सिनेमात गावाकडचं न्यायालय पाहण्याची संधी मिळते.

मध्यंतरापर्यंत सिनेमा चांगली पकड घेतो. त्यानंतर मुलाला आपल्याकडे ठेवण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नात काहीसा संथ होतो. मुलाला शिकवण्यासाठी केलेल्या युक्ता चांगल्या आहेत, पण त्यांच्या सादरीकरणात उणीवा जाणवतात. सारं कसं गोड गोड दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळं 'बाबा'नं केलेला संघर्ष प्रभावी वाटत नाही. एखादं नकारात्मक कॅरेक्टर असतं, तर कदाचित बाबाचा संघर्ष अधिक उठावदारपणं समोर आला असता असं वाटतं. मध्यंतरानंतर सायकलची घंटी परत देण्याच्या सीनपासून, क्लायमॅक्समधील कोर्टसीनपर्यंत काही प्रसंगांमध्ये इमोशन्स जाणवतात. संवाद फार नाहीत, पण बोलीभाषेकडे लक्ष देण्याची गरज होती. राज गुप्ताचा हा पहिलाच सिनेमा असून, त्यानं यासाठी खूप मेहनत घेतल्याचं चित्रपट पाहिल्यावर जाणवतं.

दीपक डोब्रीयालनं अफलातून बाबा साकारला आहे. एकही संवाद नसताना त्यानं नंदिता पाटकरच्या साथीनं केलेल्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हातवारे आणि चेहऱ्यावरील भाव यांच्या सहाय्यानं दीपकनं साकारलेला माधव स्मरणात राहणारा ठरतो. आपण एक उत्तम अभिनेत्री आहोत हे नंदितानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. या दोघांच्या जोडीला आर्यन मेंघजी या बालकलाकारानंही कमालीचं काम केलं आहे. चेहऱ्यावरील भाव सादर करण्यात तो कुठंही कमी पडलेला नाही. चित्तरंजन गिरी यांनी साकारलेला तोतरा त्र्यंबकही गंमतीशीर आहे. अभिजीत खांडकेकर आणि स्पृहा जोशी यांनी आपापल्या भूमिका चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. शैलेश दातार, जयवंत वाडकर, जयंत गाडेकर, कैलास वाघमारे यांनी चांगली साथ दिली आहे.

थोडक्यात काय तर मूक-बधीर असल्यानं हतबल न होता परिस्थितीशी लढा देणाऱ्या एका गरीब 'बाबा'ची ही कहाणी कलाकारांचा अभिनय आणि सुरेख वनलाईन यासाठी एकदा तरी पहायला हवी.

दर्जा : ***

................................

मराठी चित्रपट : बाबा

निर्माते : मान्यता दत्त आणि अशोक सुभेदार 

दिग्दर्शक : राज आर गुप्ता 

कथा, पटकथा : मनीष सिंग 

कलाकार : दीपक डोब्रियाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, आर्यन मेंघजी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, कैलास वाघमारे, जयंत गाडेकर
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा