Advertisement

Movie Review : गोपाळरावांची जिद्द अन् आनंदीबाईंचा ध्यास

भारतातील पहिल्या महिला डॅाक्टर असलेल्या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या संघर्षाची कथा या सिनेमात आहे.

Movie Review : गोपाळरावांची जिद्द अन् आनंदीबाईंचा ध्यास
SHARES

काळाच्या पडद्याआड गेलेल्या अशा बऱ्याच ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्या कधी प्रकाशात आल्याच नाहीत. त्यांना सिनेमांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणण्याचं कार्य अलीकडच्या काळात मोठ्या जोमात सुरू आहे. 'आनंदी गोपाळ' हा सिनेमाही एका अशा स्त्रीची आणि तिच्या पतीची कथा सांगणारा आहे, जिनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक ध्येय नजरेसमोर ठेवलं आणि ते प्राप्तही केलं. भारतातील पहिल्या महिला डॅाक्टर असलेल्या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या संघर्षाची कथा या सिनेमात आहे.


संघर्षाची झलक

हा एक चरित्रपट असल्याने यात वास्तववादी चित्र दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील काळ दिग्दर्शक समीर विद्वांस आणि त्याच्या टिमने उत्तमरीत्या पडद्यावर सादर केला आहे. कुठेही अतिरंजीतपणा न आणता अतिशय साधेपणाने दाखवण्यात आलेला गोपाळराव आणि आनंदीबाई यांचा सांसारीक आणि शैक्षणिक प्रवास मनाला भावतो. हा सिनेमा म्हणजे केवळ त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षांची एक झलक आहे, पण वास्तवात त्या काळी त्यांनी डॅाक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि समाजाचा रोष ओढवून ते साकारही करून दाखवलं याचंच कौतुक वाटतं.


डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी

ही गोष्ट आहे १८८६ पूर्वीच्या काळातील. पोस्टात काम करणारे गोपाळराव जोशी (ललित प्रभाकर) पहिल्या पत्नीचं निधन झाल्यावर लग्नासाठी मुलगी पाहात असतात. इंग्रजी भाषा आणि स्त्री शिक्षणाला पर्याय नाही हे त्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेलं असतं. त्यामुळेच ज्या मुलीला शिकण्याची इच्छा आहे तिच्याशीच त्यांना विवाह करायचा असतो. पुढे आनंदीशी (छोटी - अंकिता गोस्वामी, मोठी - भाग्यश्री मिलिंद) गोपाळरावांचा विवाह होतो. गोपाळराव आनंदीला पाढे पाठ करायला सांगून जातात, पण तिच्याकडून ते होत नाही. त्यामुळे ते थेट तिला सोडून निघून जातात. बराच काळ लोटतो अखेरीस आनंदीचे वडील (योगेश सोमण)आणि सोमण भटजी (जयंत सावरकर) यांनी मनधरणी केल्यावर ते परततात. तोपर्यंत आनंदीनेही पाढे पाठ केलेले असल्याने गोपाळराव शांत होतात. पत्नीला खूप शिकवायचं ही गोपाळरावांची जिद्द दोघांनाही ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कल्याण, कोलकाता असा प्रवास घडवते. पत्नीला शिकवत असल्याने गोपाळरावांना समाजाचा प्रचंड रोष ओढवून घ्यावा लागतो. दोघांचंही जगणं मुश्कील होतं, तरीही ते जिद्द सोडत नाहीत. अचानक त्यांच्या जीवनात एक अप्रिय घटना घडते. इथे मग गोपाळरावांची जिद्द आनंदीबाईंचा ध्यास बनतो आणि त्या डॅाक्टर बनण्याचा निर्णय घेतात. आनंदीने पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी गोपाळराव जीवाचं रान करतात. अखेर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या नावापूर्वी 'डॅाक्टर' ही पदवी लागतेच.


पत्रातून सिनेमाची सुरूवात

या सिनेमाची कथा प्रसिद्ध लेखक श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' या कादंबरीवर आधारीत आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा मनावर गारूड करणारी आहे. सिनेमाचं लेखन करताना करण शर्मा यांनीही त्याची काळजी घेतली आहे. त्यांनी सिनेमाची सुरुवात एका पत्राच्या माध्यमातून केली आहे. हे पत्रच पुढे आनंदीबाईंचा अर्धा अधिक प्रवास उलगडतं. या पत्र वाचनासोबत आपणही 'आनंदी गोपाळ'च्या प्रवासात अनाहुतपणे सहभागी होत जातो. हा सिनेमा केवळ आपल्या देशातील पहिल्या महिला डॅाक्टर बनलेल्या आनंदीबाई जोशी यांचा जीवनप्रवास अधोरेखित करणारा नसून, त्यांना प्रोत्साहित करणारे त्यांचे पती गोपाळराव यांच्या समाजात वैचारिक क्रांती घडवण्याच्या निर्णयांचाही आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.


पुरूषप्रधान संस्कृतीचा अडसर

त्या काळी स्त्रियांचं घराबाहेर पडणं, समाजासमोर वावरणं, शिक्षण घेणं, स्वत:च्या नवऱ्यासोबत फिरणंही पाप मानलं जायचं. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत तेव्हा केवळ पुरुषच स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येत नव्हते, तर जुन्या विचारांच्या स्त्रियाही स्त्रियांची प्रगती खुंटण्यात अग्रेसर असायच्या. या सर्वांविरोधात गोपाळरावांनी वैचारिक बंड पुकारलं. इतरांना ब्रम्हज्ञान शिकवण्याऐवजी स्वत:पासून सुरुवात करत पत्नीलाच सुशिक्षित करण्याचा निर्णय घेतला, पण तो वाटतो तितका सोपा नव्हता. ज्या वेळी स्त्रियांना उंबरठा ओलांडण्याची अनुमती नव्हती, त्या वेळी गोपाळरावांनी खूप धक्के सहन करत पत्नीला वैद्यकीय शिक्षणासाठी थेट अमेरिकेला पाठवलं. केवढं मोठं हे धाडस... 'गर्भवती स्त्रिया पुरुष डॅाक्टरांशी मोकळेपणानं बोलू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांची अपरिमीत हानी होते' हा संवाद त्या काळातील स्त्रिया कशा प्रकारे कुंठित जीवन जगत होत्या त्याची प्रचिती देणारा आहे. 'ज्या देशात माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही' हा आनंदीबाईंच्या मुखातील संवाद त्यांचा देशाभिमान दर्शवणारा आहे.


प्रेरणादायी प्रवास

इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमातही काही चुका आहेत, पण हा एक प्रेरणादायी प्रवास असल्याने चुकांऐवजी चांगल्या गोष्टीच जास्त हायलाईट करण्याची गरज वाटते. समीर विद्वांसने पुन्हा एकदा बाजी मारत अतिशय संयतपणे आनंदी-गोपाळ यांचा प्रवास पडद्यावर रेखाटला आहे. १३२ वर्षांपूर्वीचा काळ पडद्यावर सादर करताना कलादिग्दर्शनापासून, कॅमेरावर्कपर्यंत आणि कॅास्च्युमपासून संगीतापर्यंत सर्वच पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. हृषीकेश दातार, सौरभ बालेराव, जसराज जोशी या त्रिकूटानं दिलेलं संगीत लक्षात राहणारं आहे. 'रंग माळीयेला...', 'आनंदघन येई घरा...', 'वाटा वाटा वाटा गं...' या गाण्यांच्या जोडीला 'तू आहेस ना...' हे भारतातील सर्व ऐतिहासिक महिलांना अभिवादन करणारं गाणंही स्मरणीय आहे. 'उजाडलं उजाडलं, जरा धीर धर...' हा गोंधळ प्रेरणादायी आहे.


उत्तम अभिनय

अंकिता गोस्वामीनं लहानग्या, तर भाग्रश्री मिलिंदनं मोठ्या आनंदीच्या भूमिकेत खूप छान अभिनय केला आहे. सोशिक, सुशील, हौशी, आज्ञाधारक आनंदीची भूमिका दोघींनी चांगल्या प्रकारे साकारली आहे. सर्वात जास्त कौतुक करावंसं वाटतं ते ललित प्रभाकरचं. विक्षिप्त, संतापी, धर्माविरोधात बंड पुकारणारा, वेळप्रसंगी धर्मांतरही करायला मागे पुढे न पाहणारा, जिद्दी, मेहनती, धर्मपंडीतांनाही भीक न घालणारा गोपाळराव ललितने अफलातून साकारला आहे. त्याच्या आजवरच्या भूमिकांमधील ही सर्वोत्तम भूमिका आहे. गोपाळरावांच्या पहिल्या पत्नीच्या आईच्या म्हणजेच त्यांच्या सासूच्या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी यांनी जबरदस्त काम केलं आहे. अथर्व फडणीसने कृष्णाची छोटीशी, काहीशी गंमतीदार भूमिका चांगली केली आहे. यांना क्षिती जोग, योगेश सोमण, जयंत सावरकर, गॅरी जॅान, सोनिया अॅलबिझुरी यांनी छान साथ केली आहे.


आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे, तर किंचित त्यांच्या पुढे गेल्या आहेत, हे खरं असलं तरी स्त्री जीवनात क्रांतीची ठिणगी पेटवणाऱ्या जिद्दी आणि ध्येयवेड्या दोन व्यक्तींचा प्रवास या सिनेमात आहे. त्यामुळे एका सामान्य जोडप्याच्या संघर्षाची असामान्य कथा प्रत्येकाने पाहायला हवी अशीच आहे.

दर्जा : ****
..........................................................................................

निर्मिती : नम: पिक्चर्स, झी स्टुडियो, फ्रेश लाइम फिल्म्स

लेखन : करण श्रीकांत शर्मा

दिग्दर्शक : समीर विद्वांस

कलाकार : ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, अंकिता गोस्वामी, गीतांजली कुलकर्णी, अथर्व फडणीस, क्षिती जोग, योगेश सोमण, जयंत सावरकर, गॅरी जॅान, सोनिया अॅलबिझुरी



हेही वाचा -

Movie Review : गली बॉय' के मन की 'मुराद'!

‘लोकल-व्हाया-दादर’च्या प्रेमात वरुण!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा