Advertisement

Movie Review : सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा स्वप्नवत प्रवास

लहानशा झोपडीत राहणाऱ्या बबनच्या अंगावर पतसंस्थेचं कर्ज, किराणावाल्याची उधारी अशी बरीच देणी असतात. मुलांचं शिक्षण करताना त्यांची हौस भागवणंही त्याला जमत नसतं.

Movie Review : सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा स्वप्नवत प्रवास
SHARES

एखादी लॉटरी लागली किंवा घबाड मिळालं तर एका रात्रीत आपलंही नशीब बदलेल, असं स्वप्न जवळजवळ सर्वच जण पाहत असतात. या जगात काहीही सहजपणे मिळत नाही. मेहनत केली तर मात्र मिळाल्याशिवाय राहत नाही असं आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत. काही नशीबवान याला अपवाद ठरतात. अगदी स्वप्नातल्याप्रमाणे त्यांचं नशीब पालटतं आणि ते ‘नशीबवान’ ठरतात.

सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक अमोल गोळेने ‘नशीबवान’ या चित्रपटात अशाच एका सर्वसामान्य माणसाची कथा मांडली आहे. सर्वसामान्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी अमोलने भाऊ कदम आणि मिताली जगताप या कसलेल्या कलाकारांचा आधार घेतला आहे. या प्रयत्नात तो कितपत यशस्वी झाला आहे ते चित्रपट पाहिल्यावर समजतं.


उत्तम कथानक

चित्रपटाची कथा बबन (भाऊ कदम) नावाच्या सफाई कामगाराभोवती गुंफण्यात आली आहे. संसाराचा गाडा ओढण्यासाठी बबनची पत्नीही (मिताली जगताप) घरकाम करत असते. लहानशा झोपडीत राहणाऱ्या बबनच्या अंगावर पतसंस्थेचं कर्ज, किराणावाल्याची उधारी अशी बरीच देणी असतात. मुलांचं शिक्षण करताना त्यांची हौस भागवणंही त्याला जमत नसतं. 

एकदा एक गटार साफ करण्याचं काम त्याला मिळतं. सफाई करताना त्याची झाडू सुटते. झाडू बांधून सरळ करण्यासाठी बबन जेव्हा ती बाजूच्या भिंतीवर आपटतो, तेव्हा त्या भिंतीतील एक वीट खाली पडते. आत डोकावून पाहतो, तर भिंती पलिकडे बबनला पैशांची बंडल दिसतात. बबनचं नशीब खुलतं, पण लक्ष्मी आल्यावर ती उधळायची नसते हे विसरलेल्या बबनला मिळालेल्या पैशांचा नीट उपभोगही घेता येत नाही हेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.


गती  संथ

चित्रपटाची कथा उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’वर आधारित आहे. त्यावर अमोल गोळेने पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. लेखन आणि दिग्दर्शन करताना अमोलने स्थळ, काळाचं भान राखत, तसंच वर्तमान परिस्थितीनुरूप बदल करत वेगवान सिनेमा बनवण्याची आवश्यकता होती. सिनेमाची गती संथ असल्याने केवळ व्यक्तिरेखा बोलत राहतात, कानावर संवाद येत राहतात, प्रत्यक्षात पडद्यावर मात्र काही विशेष घडत नाही. उदय प्रकाश यांच्या कथेतील गाभा न बदलता अमोलने चांगली पटकथा लिहिली असली तरी आपल्या शैलीत ती सादर करताना इतर गोष्टींचं भान राखण्याचीही गरज होती.


संकलनात ढिलाई

सिनेमातील काही प्रसंग गंमतीशीर आहेत. विशेषत: बबन आणि त्याच्या पत्नीसोबतची चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागातील दृश्ये खूप चांगली झाली आहेत. काही प्रसंग उत्कंठा वाढवणारे असले तरी संथ गतीचा फटका या दृश्यांना बसल्याने त्याबाबतचं कुतूहल कमी होतं. गाणी विशेष स्मरणात राहणारी नाहीत. 

अमोल एक उत्तम सिनेमॅटोग्राफर असल्याचं या चित्रपटाने पुन्हा सिद्ध केलं आहे. कला दिग्दर्शनाची बाजूही चांगली आहे. याशिवाय कलाकारांचे कॉस्ट्युमही वास्तववादी आहेत. कथेचा जीव छोटा असला तरी सिनेमाची लांबी मोठी आहे. मित्रांसोबत मद्यप्राशन करणाऱ्या दृश्यांसोबतच गाण्यांमध्येही काटछाट करता आली असती. त्यामुळे संकलनात ढिलाई झाल्याचं जाणवतं.


सुरेख अभिनय

या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या प्रतिभेला साजेसा अभिनय केला आहे. मुख्य भूमिकेत भालचंद्र उर्फ भाऊ कदम पुन्हा एकदा भाव खाऊन गेला आहे. त्याने साकारलेला आधी गांजलेला आणि नंतर मातलेला बबन लक्षात राहणारा आहे. मिताली जगतापने सुरेख हावभाव आणि देहबोलीच्या मदतीने भाऊला उत्तम साथ दिली आहे. नेहा जोशीने पुन्हा एकदा एका वास्तवदर्शी व्यक्तिरेखेला प्रामाणिकपणे न्याय दिला आहे. सहाय्यक भूमिकांमध्ये जयवंत वाडकर, यतिन कार्येकर, राजेश श्रृंगारपुरे, विद्या गोखले, प्रवीण डाळींबकरसह इतर कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.

सिनेमाची गती संथ असल्याने ‘नशीबवान’ भाऊ कदमचा हा स्वप्नवत प्रवास काहीसा कंटाळवाणा वाटतो. कलाकारांचा अभिनय आणि सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा आलेख पाहायचा असेल तर एक चान्स घ्यायला हरकत नाही.

दर्जा : **१/२ 

………………………………..........................

कथा : उदय प्रकाश लिखित दिल्ली कि दिवार आधारित 

पटकथा, संवाद, दिग्दर्शन, छायालेखन : अमोल वसंत गोळे 

कलाकार : भालचंद्र (भाऊ) कदम , मिताली जगताप-वराडकर, नेहा जोशी, जयवंत वाडकर, यतिन कार्येकर, राजेश श्रृंगारपुरे, विद्या गोखले, प्रवीण डाळींबकर


हेही वाचा -

...जेव्हा उद्धवनाही 'ठाकरे'च्या गाण्यावर नाचावसं वाटतं !



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा