Advertisement

Movie Review : प्री-वेडींग शिनेमाची धमाल गोष्ट

गोष्ट आहे सासवडमधील प्रकाश सहाने उर्फ पक्या (शिवराज वायचळ) आणि मुंबईतील परी प्रधान (ऋचा इनामदार) यांची. मेडीकलचं शिक्षण पूर्ण केल्यावर परी सासवडमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी येते. तिथे तिची ओळख पक्याशी होते. तिला पाहताच पक्या तिच्या प्रेमात पडतो, पण तिला सांगायला धजावत नसतो.

Movie Review : प्री-वेडींग शिनेमाची धमाल गोष्ट
SHARES

ऐन लग्नसराईत लग्नसोहळ्यावर आधारित एखादा चित्रपट येणं म्हणजे जणू मनोरंजनाची हलकीफुलकी ट्रीटच. संगीत दिग्दर्शनाकडून चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलेल्या डाॅ. सलील कुलकर्णी यांचा ‘वेडींगचा शिनेमा’ या चित्रपटाबद्दलही असंच काहीसं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आजच्या पिढीतील बदललेली लग्नपद्धती आणि त्यासोबत बदललेली माणसं या चित्रपटात पाहायला मिळतात. त्या अनुषंगानं घडणारे विनोद केवळ पोट धरून हसवतच नाहीत, तर कायम त्याच मूडमध्ये चित्रपट पाहण्याची उर्जाही देतात.


प्री-वेडींग फिल्म

फार पूर्वी लग्नात ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट मानली जायची. पण नंतर काळ बदलत गेला. ब्लॅक अँड व्हाईट फोटोंची जागा कलर फोटो आणि व्हिडीओ शूटिंगनं घेतली. आता प्री-वेडींग फिल्मचा ट्रेंड आहे. हा चित्रपटही याच प्री-वेडींग फिल्मचा धागा पकडून बनवण्यात आला आहे. प्रेमाचा होकार-नकार आणि लग्नाच्या अटी-मानपान यात न अडकता थेट नायक-नायिकेचं प्रेम आणि त्यानंतर वेडींगचा थाट दाखवण्यापूर्वीचा शिनेमा बनवण्याचा खटाटोप करत हा चित्रपट खऱ्या मुद्द्याला हात घालतो.


थेट लग्नाचा थाट

गोष्ट आहे सासवडमधील प्रकाश सहाने उर्फ पक्या (शिवराज वायचळ) आणि मुंबईतील परी प्रधान (ऋचा इनामदार) यांची. मेडीकलचं शिक्षण पूर्ण केल्यावर परी सासवडमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी येते. तिथे तिची ओळख पक्याशी होते. तिला पाहताच पक्या तिच्या प्रेमात पडतो, पण तिला सांगायला धजावत नसतो. अखेर परीच पक्याला प्रपोज करते. दोघांच्या घरून काहीच अडचण नसल्यानं थेट लग्नाचा थाट आखला जातो.


इरसाल पात्र

आपलीही प्री-वेडींग फिल्म बनावी असं परीला वाटत असतं. या प्री-वेडींग फिल्मचं दिग्दर्शन उर्वी (मुक्ता बर्वे) करणार असते. उर्वीला मात्र एखाद्या चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं असतं, पण नाईलाज म्हणून ती ही फिल्म करत असते. या फिल्ममध्ये तिलाही काहीतरी वेगळं करायचं असतं, पण ही फिल्म करता करता जगाला जे हवं असतं तेच द्यावं लागतं हे तिलाही जाणवतं. या दरम्यान बरीच इरसाल पात्र तिला भेटतात आणि अनाहुतपणं तिला मार्गदर्शनही करतात. 


शाब्दिक विनोदांचा खुमासदारपणा

या चित्रपटाचं लेखनही सलील कुलकर्णी यांनीच केलं आहे. त्यांनी पटकथेची मजबूत बांधणी केली असून, त्याला खुसखुशीत संवादांची जोड दिली आहे. त्यामुळं प्रासंगिक विनोदांच्या सोबतीला शाब्दिक विनोदांचा खुमासदारपणा या चित्रपटात अनुभवायला मिळतो. चित्रपटाची सुरुवात टिपीकल पद्धतीनं होत नाही. शूटच्या माध्यमातून अधूनमधून फ्लॅशबॅकमध्ये जात चित्रपट आपली कथा सांगतो आणि नंतर वर्तमानातच सुरू राहतो. यासाठी आवश्यक असणारी गती राखण्यातही कुलकर्णी यशस्वी झाले आहेत. सारं काही आलबेल सुरू असताना एका अघटीत वळणावर एक छोटासा प्रश्न उपस्थित करत होणारं मध्यंतर पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता वाढवतं.


मध्यंतरानंतर गती मंदावली

मध्यंतरानंतर चित्रपटाची गती थोडी मंदावल्यासारखी वाटते. हास्याची कारंजी ठराविक अंतरानं फुलतात. त्यामुळं कंटाळा आल्यासारखा वाटतो, पण या दरम्यान उर्वी, पक्या आणि परी या तिघांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेण्याचं काम सुरू असतं हे नंतर हळूहळू जाणवू लागतं. संदीप खरेनं लिहिलेली गाणी प्रसंगानुरूप असून, टिपीकल संदीप-सलील जोडीच्या फ्लेवरमधील असल्यानं त्यांच्या चाहत्यांसोबतच सर्वांनाच आवडणारी आहेत. या चित्रपटात उगाच फाफटपसारा नाही. त्यामुळं संकलनाची बाजूही भक्कम असल्याचं जाणवतं. कुलकर्णी यांनी दिग्दर्शनात पदार्पण करतानाच एक गंमतीशीर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यानं पुढच्या चित्रपटाच्या वेळी त्यांची जबाबदारी आणखी वाढलेली असेल.


ऋचाचे रूक्ष संवाद

या चित्रपटात कलाकारांची फार मोठी फळी आहे. शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवी जोडी या चित्रपटात आहे. शिवराजनं यापूर्वीही आपल्या भूमिकांमधून लक्ष वेधून घेतलं आहे. या पहिल्या सोलो हिरो चित्रपटातही त्यानं सुरेख काम केलं आहे. ऋचानंही त्याला सुंदर साथ दिली आहे, पण संवादफेक हा तिचा मायनस पाइंट आहे. आवाजाला धार आणि सूर नसल्यानं संवाद ऐकताना रुक्ष वाटतात. मुक्तानं अतिशय बॅलन्स अभिनय केला आहे. मनातील विचारांचा गुंता चेहऱ्यावर दाखवण्यात ती यशस्वी झाली आहे. अलका कुबल यांनी साकारलेली नायकाची आई या चित्रपटातील हुक कॅरेक्टर आहे. सुशिक्षीत असूनही गृहीणी बनलेल्या अलका यांची विचारसरणी उर्वीच्या मनातील गुंता सोडवण्यास मदत करते.


कोरिओग्राफर जम्बो 

 त्यागराज खाडीलकरचं काम फार मोठं नसलं तरी त्यानं साकारलेला कोरिओग्राफर जम्बो पडद्यावर येताच आपोआप हसू येतं. भाऊ कदमला फटकेबाजीसाठी फार वाव नसला तरी त्यानं साकारलेला डीओपी छान झाला आहे. सुनील बर्वेनं अतिशय संयतपणं साकारलेला डाॅक्टर जसा मनाला भावतो, तशी अश्विनी काळसेकरने साकारलेली करियरीस्टीक डाॅक्टरही बरंच काही सांगून जाते. शिवाजी साटम, संकर्षण कऱ्हाडे, प्रवीण तरडे, प्राजक्ता हणमगर यांनीही चांगलं काम केलं आहे.

लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरणाच्या पातळीवर चांगल्या असलेल्या या चित्रपटाला कलाकारांनी आपल्या अभिनयानं एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. त्यामुळंच हा खुमासदार चित्रपट एकदा तरी पाहायलाच हवा.

……………………………………

मराठी चित्रपट : वेडींगचा शिनेमा

निर्मिती : गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबी

लेखक-दिग्दर्शक : संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी

कलाकार : मुक्ता बर्वे, शिवराज वायचळ, ऋचा इनामदार, भालचंद्र (भाऊ) कदम, शिवाजी साटम, अलका कुबल आठल्ये, अश्विनी काळसेकर, सुनील बर्वे, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, सुनील अभ्यंकर, योगिनी पोफळे, प्राजक्ता हणमगर, प्रणित कुलकर्णी, संदीप खरे, विनोद सातव, त्यागराज खाडिलकर, रुक्मिणी सुतार, पौर्णिमा अहिरे, आदेश आवारे



हेही वाचा -

अखेर ‘रमाई’च्या रूपात अवतरणार वीणा!

'स्टेपनी' घेऊन आला भरत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा